पुणे : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसलेला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे खरिप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असले सध्याचे वातावरण काही पिकांसाठी अत्यंत पोषक असे आहे. याशिवाय शेतात असलेल्या पिकांची योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शेतकर्यांचे मोठे नुकसान होवू शकते. संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिकांची कशी काळजी घेतली पाहिजे? याबाबत तज्ञांनी काय सल्ला दिला आहे, याची माहिती आज आपण जाणून येवूया.
जुलै महिन्यापासून राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले धान पिकाला मात्र, फायदा झाला आहे. धानाची लागवड आता पूर्ण झाली असून अनेक ठिकाणी धान पिकांची उगवण झाली आहे. अशा स्थितीत पिकांची योग्य पध्दतीने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पिके उगवताच पिवळी पडली असतील त्यावर झिंक सल्फेट ६ किलो ३०० लिटर पाण्यात मिसळून एका हेक्टरावरील धानावर फवारावे. यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव तर कमी होणारच आहे पण पीकही जोमात बहरणार आहे.
सध्याच्या काळात चारा पिकांसह गाजर, स्वीट कॉर्न, बेबी कॉर्नच्या लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. ज्या शेतकर्यांची टोमॅटो, हिरवी मिरची, वांगी आणि फुलकोबीची रोपे तयार केली आहेत त्यांनी हवामान लक्षात घेऊन बेड पद्धतीने लागवड करावी. पाण्याचा निचरा होईल याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. यासह दुसरीकडे कीटक आणि रोगराईवरही लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. सोयाबीन, मका, बाजरी आणि भाज्यांमधील तण काढून मशागतीची कामे केली तर उत्पादनात वाढ होणार असल्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
किटकनाशकांचा असा करा बंदोबस्त
किटकामुळे उत्पादन घट होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केवळ औषध फवारणीच हा पर्याय नाहीतर शेतकरी देशी पध्दतीचाही अवलंब करु शकतात. शेत शिवारात हलके सापळे बसवून नियंत्रण ठेवता येणार आहे. त्याकरिता शेतकर्यांना प्लास्टिकच्या टबमध्ये किंवा मोठ्या भांड्यात पाणी व काही कीटकनाशके मिसळून एक बल्ब लावून तो रात्री शेताच्या मधोमध ठेवावा लागणार आहे. कीटक प्रकाशाने आकर्षित होतील आणि त्याच द्रावणावर पडून मरतील.