हवामान बदल : शास्त्रज्ञांनी पीक पध्दतीबाबत शेतकऱ्यांना दिला हा सल्ला

advice-on-changes-in-cropping-patterns-due-to-climate-change

शेत शिवार । पुणे : ग्लोबल वॉर्मिंग अर्थात हवामान बदलावर सातत्याने चर्चा होत असते. हवामान बदलाचे परिणाम सर्वच क्षेत्रांवर व घटकांवर होतांना दिसत आहेत. हे बदल असेच कायम सुरू राहिल्यास येत्या दशकामध्ये जागतिक कृषी व्यवस्था संकटात येवू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. अमेरिकेच्या नासा या जग प्रसिद्ध संस्थेतील तज्ञ जोनास जॅगेरमयर (Jonas Jägermeyr – NASA GISS) यांनी हवामान बदलाचे संकेत व जागतिक कृषी व्यवस्थेवर त्याचे होणारे परिणामांवर अभ्यास करुन आपला संशोधन अहवाल प्रसिध्द केला आहे. शेतकर्‍यांनीही नवे बदल जाणून घेऊन त्यानुसार पीक पद्धतींत बदल करणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष या अहवालात मांडला आहे. या अहवालाची माहिती ‘नेचर डॉट कॉम’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संशोधक जोनास जॅगेरमेयर, चेरिस्टो मुलर व सँठिया रोसेनझ्विग यांनी मिळून १ नोव्हेंबर २०२१ रोजी एक संशोधन अहवाल प्रसिध्द केला आहे. यामध्ये हवामान बदल व कृषी क्षेत्रावर होणार्‍या परिणामांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मानवी हस्तक्षेपांमुळे होत असलेल्या विविध घडामोडींमुळे हरितगृह वायूंचे प्रसारण होऊ लागले आहे. त्यामुळे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पर्जन्यमान पद्धती बदलल्या आहेत. हवेत कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. पिकांच्या वाढीवर या बदलाचा परिणाम होऊ लागला आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांचे उत्पादन आता पूर्वीप्रमाणे स्थिर पातळीत न राहता बदलले आहे. हे हवामान बदल असेच पुढे सुरू राहिले तर येत्या दशकात जागतिक कृषी व्यवस्थेत व त्यातही अन्नधान्य उत्पादक देशांमध्ये त्याचे सखोल परिणाम घडण्याचा धोका स्पष्ट दिसत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

मका, गव्हाचे उत्पादन घटण्याचा धोका

बदलत्या हवामानाला सुसंगत पद्धतीने शेतकर्‍यांनीही जलदगतीने बदलणे गरजेचे आहे. नुकसान टाळण्यासाठी पीक लागवडीचा प्रचलित कालावधी वा तारखा बदलणे किंवा विविध पीकवाणांचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे अभ्यासात सूचित करण्यात आले आहे. शतकाच्या अखेरीपर्यंत मक्याचे उत्पादन एक चतुर्थांश पटीने घटण्याची तर गव्हाचे जागतिक उत्पादन १७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदविण्यात आला आहे. अभ्यासानुसार पीक उत्पादनासाठी केवळ तापमान हा एकच घटक कारणीभूत नाही. तर कार्बन डायऑक्साइडची वातावरणात वाढलेली पातळी गव्हाच्या वाढीसाठी अनुकूल ठरू शकते. मात्र त्याच वेळी त्यातील पोषणमूल्यांमध्ये घट येऊ शकते. वाढलेल्या जागतिक तापमानाचा पर्जन्यमान पद्धतींशीही संबंध आहे. त्याचबरोबर उष्ण लाटेचे प्रवाह किंवा अवर्षण ज्या ज्या कालखंडाने उद्भवतील त्यानुसार पिकाचे आरोग्य व उत्पादकता यांना धोका पोहोचेल, असेही अभ्यासात म्हटले आहे.

Exit mobile version