पुणे : काही दिवसांपुर्वी निंबूचे दर सर्वोच्च पातळीवर पोहचले होते. अगदी एक निंबू १० रुपयांना मिळत होता. तशीच परिस्थिती आता टोमॅटो बाबत झाली आहे. १० दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये किलोवर असलेला टोमॅटोने आता शंभरी पार केली आहे. उत्पादनात झालेली घट आणि वाढलेली मागणी यामुळे दरात विक्रमी वाढ झाली आहे. पण याचा सर्वाधिक फायदा शेतकर्यांना नसून व्यापार्यांना होत आहे.
गतवर्षी घसरत्या दरामुळे शेतकर्यांनी टोमॅटो तोडणीचेही कष्ट घेतले नव्हते तर यंदा बाजारपेठेतच नाही तर शेतामध्येही टोमॅटो पाहवयास मिळत नाही अशी स्थिती आहे. दरवर्षी होणारे नुकसान पाहता लागवड क्षेत्रात मोठी घट झाली. शिवाय वातावरणातील बदलामुळे आहे ते उत्पादनही शेतकर्यांच्या पदरी पडले नाही.
त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारपेठेत कायम टोमॅटोची आवक ही कमीच राहिलेली आहे. वाढती मागणी घटलेला पुरवठा यामुळे मुख्य बाजारपेठांमध्ये दरामध्ये तिपटीने वाढ झाली आहे. १० दिवसांपूर्वी टोमॅटो ३० रुपये किलो होता तर आता ११० रुपये किलो.
कमी आवक असल्याने बाजारपेठेत टोमॅटोचा कृत्रिम तुटवडा तर मागणी नसल्याचे सांगत शेतकर्यांकडून कवडीमोल दरात खरेदी केली जाते. याचा सर्वाधिक फटका शेतकर्यांना बसत आहे. सध्या राज्यभरातील मुख्य बाजारपेठेत टोमॅटोची आवक मागणीपेक्षा कमी होत आहे. शिवाय यावरच टोमॅटोच्या दराचे भवितव्य अवलंबून आहे. आता उत्पादन घटले असले तरी भविष्यात आवक वाढली तरच दरात घसरण होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.