पुणे : माती परीक्षण ही शेतीतील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. माती परिक्षणामुळे जमिनीचा दर्जा तर लक्षात येतोच पण कोणते पीक घेऊन उत्पादकता वाढवता येते याचा अचूक अंदाजही बांधता येतो. मात्र याचे महत्त्व अजून अनेक शेतकर्यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. यासाठी सरकारी आणि खासगी पातळीवर वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती होत असली तरी शेतकरी माती परिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. यामुळे उत्पादनात घट होणे, पिकांवर विविध आजारांचा प्रादुर्भाव होणे अशा प्रकारची संकटे निर्माण होतात. यावर तोडगा काढण्यासाठी आता केंद्रिय पातळीवर ठोस योजना आखण्यात आली आहे.
राष्ट्रीय मृदा सर्वेक्षणच्या माध्यमातून देशभरात एक प्रकल्प राबवला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत देशातील ११५ जिल्ह्यामध्ये उपक्रम राबवला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर २७ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मातीचे गुणधर्मांचा अभ्यास करुन जमिनीचा दर्जा काय आहे. त्यामध्ये कोणती पिके घेतली जाऊ शकते तर उत्पादनात वाढ कशी करायची याबाबतही शेतकर्यांना मार्गदर्शन होणार आहे.
पीक पध्दतीमध्ये मातीची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. जमिनीच्या प्रतिनुसार पिकाची निवड व नियोजन करता येते. जमिन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करता येते. मात्र याकडे दुर्लक्ष होते. कोणत्याही मातीमध्ये कोणतेही पीक घेता येते हा शेतकर्यांचा मोठा समज आहे. मात्र, यामुळे दुहेरी नुकसान होते. एकतर जमिनीचा पोत टिकून राहत नाही आणि शेतकर्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. यामुळे आता राष्ट्रीय मृदा सर्वेक्षणच्या माध्यमातून राबविल्या जाणार्या या प्रकल्पामुळे शेतकर्यांना योग्य दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.