जळगाव : कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या सहा वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्या अॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे 11 ते 14 नोव्हेंबर दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (11 मार्च) प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. हे कृषी प्रदर्शन मोफत असून शेतकर्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
तब्बल चार एकरच्या परिसरात 250 पेक्षा अधिक स्टॉल्स असलेले अॅग्रोवर्ल्डचे चार दिवसीय कृषी प्रदर्शन खानदेशातील शेतकर्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, अपारंपारीक पिके अशा शेतकऱ्यांची मागणी व गरजेवर आधारित मांडणी हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. अॅग्रोवर्ल्डचे जळगावतील यंदाचे हे आठवे प्रदर्शन असून एक लाखांहून अधिक शेतकरी प्रदर्शनाला भेट देतात.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
मजूर समस्येला पर्यायी पिके तसेच यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, शाश्वत उत्पन्नासाठी करार शेतीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फळभाज्या – भाजीपाला, बांबू, सुबाभूळ अशा अनेक प्रकारच्या करार शेतीची माहिती देणाऱ्या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या विविध पिकांमधील वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची तसेच बँक कर्जाबद्दल माहिती, दूध काढणी यंत्र, काटेकोर पाणी व्यवस्थापन, अद्ययावत बी- बियाणे, खते व औषध फवारणीचे नवतंत्रज्ञान, कमी श्रमात, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स एकाच छताखाली असणार आहेत. प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध राहतील.
भाजीपाला बियाणे मिळणार मोफत
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक नोंदणीधारक शेतकर्याला निर्मल सीड्सतर्फे विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे दहा ग्रॅम बियाण्याचे एक पाकीट मोफत दिले जाणार आहे. शेतकर्यांनी या आधुनिक कृषी यंत्र व अवजारे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, के. बी. एक्स्पोर्ट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, पूर्वा केमटेक, नमो बायोप्लांट्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स, आर. सी. बाफना ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत.