जळगाव : महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस उत्पादक म्हणून जळगाव जिल्ह्याचे नाव अग्रस्थानी असते. गत हंगामात कापसाला विक्रमी भाव मिळाला. गेल्या अनेक वर्षांच्या इतीहासात प्रथमच इतका भाव मिळाल्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फायदा झाला. हे भाव अजूनही टिकून असले तरी येणार्या काळात हे दर टिकून राहतील का? अशी भीती शेतकर्यांना सतावत आहे. कारण उद्योगांकडून कापसाच्या मागणीत घट झाली आहे. सुताला मागणी नसल्यानेन किलोमागे ३० ते ४० रुपयांनी दर हे घसरले आहेत. परिणामी कापूस लागवडीच्या क्षेत्रात गतवर्षाच्या तुलनेत यंदा फार मोठी वाढ होणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आतापर्यंत कापसाला सरासरी ७ ते ८ हजार भाव मिळत होता मात्र यंदा कापसाचे दर १४ हजार ५०० रुपये क्विंटवलर येऊन ठेपले होते. त्यामुळे भविष्यातही हेच दर कायम राहतील अशी आशा शेतकर्यांनाच नव्हे तर व्यापार्यांना देखील होती. मात्र, जागतिक पातळीवरील समीकरणे बदलल्याने याचा परिणाम कापसाच्या दरावर देखील होणार आहे. याची सुरुवात देखील झाली आहे. यामुळे भविष्यात मिळणार्या दराबाबत शेतकरी अजूनही संभ्रमातच आहेत.
कापसाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील गणित पाहिल्यास आयातीत घट झाल्यामुळे देखील कापसाचे दर वाढले होते. मात्र आता परिस्थिती बदलत चालली आहे. देशात गेल्या वर्षभरात ९.५ लाख टन कापसाची आयात झाली आहे. त्यामुळे यंदाचे उत्पादन क्षेत्र आणि भारतामध्ये झालेली आयात यामुळे तीन ते चार महिन्यांमध्ये कापसाच्या दरात घट होणार असल्याचे अंदाज आहेत. त्यामुळे कापूस लागवडीपूर्वीच शेतकर्यांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.