नाशिक : भारतातील कृषि मालाची निर्यात वाढावी व कृषि मालाच्या निर्यातीत भारताचा सहभाग मोठ्या प्रमाणात असावा, यादृष्टीने केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयांतर्गत अपेडा ही संस्था कार्यरत आहे. अपेडा या संस्थेने निर्यातीस चालना देण्याच्या दृष्टीने भारतात उत्पादित होणार्या विविध शेतमालांसाठी क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रम राबविण्यत येतात. दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत जाणार्या स्पर्धेमध्ये शेतकर्यांनी पिकवलेल्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवून जागतिक बाजारपेठांमध्ये निर्यातीच्या संधी निर्माण करणे, यासाठी अपेडा ही संस्था प्रामुख्याने काम करते.
निर्यातीसाठी आवश्यक सोयीसुविधा व एकात्मिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याने अपेडा संस्थेमार्फत कृषि निर्यात क्षेत्र घोषित करून निर्यातीसाठी एकात्मिक विकास कार्यक्रम राबविण्यात येतात. फळपिके, भाजीपाला पिके, मसाल्याची पिके, काजू, चहा, बासमती तांदूळ, औषधी वनस्पती आदी पिकांच्या निर्यातीसाठी अपेडातर्फे मान्यता देण्यात येते.
मसाला कृषि निर्यात क्षेत्राअंतर्गत अपेडा खालील बाबींवर प्राधान्याने काम करते.
१) चांगल्या दर्जाच्या बियाण्यांचे उत्पादन आणि वाटप.
२) रोग आणि किडीस प्रतिकारक वाणांची निर्मिती करणे.
३) पीक काढणीनंतर शास्त्रोक्त साठवणूक, विकिरण प्रक्रिया, ग्रेडिंग, पॅकिंग सुविधा निर्माण करणे.
४) मसाल्यांवर प्रक्रिया करण्यासाठी सुविधा निर्माण करणे.
५) मसाल्यांची निर्यात आणि पणन व्यवस्था मजबूत करणे.
अधिक माहितीसाठी संपर्क : अॅग्रीकल्चर अॅण्ड प्रोसेस फूड प्रॉडक्टस् एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी, चौथा मजला, युनिट क्रमांक ३ आणि ४, बॅकिंग कॉम्पलेक्स बिल्डींग क्र.२, सेक्टर नं. १९/अ, वाशी, नवी मुंबई. फोन : ०२२-२७८४०९४९, २७८४५४४२, २७८४०३५०