मुंबई : महाराष्ट्रात लम्पी आजारामुळे जनावरं आजारी पडून दगावत आहेत. आधीच शेतकर्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे खरिप हंगामातून हाती फारसे काही येणार नाही. अशी परिस्थिती आहे. या संकटात भरीसभर म्हणून राज्यात लम्पीचा प्रादर्भाव वाढत आहे. या संकटसमयी राज्य सरकारनं शेतकर्यांना दिलासा देत, लम्पी आजारामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकाला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला ३० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार रुपयांचं आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. तर वासराचा मृत्यू झाल्या १६ हजार रुपयांची मदत संबंधित मालकाला मिळणार आहे. राज्य सरकारकडून कडून मदतीचा शासन आदेश बुधवारी जारी करण्यात आलाय. ४ ऑगस्टपासून ज्यांची जनावरं लम्पी आजारामुळे मृत्युमुखी पडली आहेत, त्यांना सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांप्रमाणे ही मदत जाहीर करण्यात आली आहे. अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक हे निकष शिथील करून राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे सर्वांना अर्थसहाय्य मिळावं, या अनुषंगाने राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे. मृत पशुधनाच्या संख्येवरील निर्बंधांचे निकष सुद्धा ही मदत देताना शिथील करण्यात येणार आहेत.