जळगाव : लिंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून (लिंबोळ्या) काढलेला अर्क होय. कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले ‘अँझॅडिरॅक्टीन’ हे किटकनाशकाचे काम करते. या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असते, तर ते पानांमध्ये कमी प्रमाणात असते. लिंबोळीपासून किटकनाशक बनविता येते. लिंबोळीत असणारा अँझॅडिरॅक्टीन हा घटक किटक, सुत्रकमी, विषाणु आणि बुरशी यांचे नियंत्रण करण्यासाठी उपयोग होतो.
लिंबोळी अर्क वापरण्याचे फायदे
१) लिंबोळी अर्काच्या फवारणीमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
२) सर्व प्रकारच्या पिकांवर १५ दिवसांच्या अंतराने नियमीत फवारणी घेतल्यास, रस शोषक किडींचे नियंत्रण होते.
३) नैसर्गिक घटक असल्या कारणाने कोणत्याही प्रकारचे रासायनिक अंश राहत नाही.
४) कीटकनाशकांसोबत वापरता येत असल्या कारणाने वापरण्यास अगदी सोपे असे हे नैसर्गिक कीडनाशक आहे.
५) पांढरी माशी, मावा, ़फुलकिडे, विविध प्रकारच्या अळ्यांचे देखील नियंत्रण चांगल्या प्रकारे होते.
एक एकर फवारणी करीता लिंबोळी अर्क तयार करण्याचा फॉम्यूला
५ किलो वाळलेल्या लिंबोळ्या, १०० लीटर पाणी, २०० ग्रॅम कपडे धुण्याची पावडर, वस्त्रगाळ करण्यासाठी कापड, १०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी पिकलेल्या लिंबोळ्या खाली पडल्यानंतर गोळा करून सावलीत वाळवून साठवणूक करा. फवारणीच्या एक दिवस आगोदर ५ किलो पूर्ण वाळलेल्या लिंबोळ्याची भुकटी तयार करा. ९ लिटर प्लास्टिकच्या बादलीत पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. लिंबोळी भिजविताना बादली व्यवस्थित झाकून ठेवावी. त्याचबरोबर लिंबोळी पावडर भिजविण्यासाठी थंड पाणी वापरावे. दुसर्या दिवशी सकाळी पाण्यात भिजत ठेवलेली भुकटी वस्त्रगाळ करून ट्रावण गाळून घ्या. नंतर १ लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम वॉशिंग पावडर किंवा साबणाचा चुरा मिक्स करून घ्या. यामुळे द्रावण पिकाच्या पानावर चिटकून राहण्यास मदत होते. हे वॉशिंग पावडरचे द्रावण वस्त्रगाळ केलेल्या ९ लिटर द्रावणात मिसळून एकत्र करून घ्या. हे दहा लिटरचे द्रावण तयार होईल. एका टाकीमध्ये ९० लिटर पाणी घ्या व वरील १० लिटरचे द्रावण त्यामध्ये मिक्स करून घ्या आणि ढवळा.