मुंबई : तीन महिन्यांपूर्वीच दुधाच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा १७ ऑगस्टपासून अमूल आणि मदर डेअरीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शेतकर्यांकडून दूध विकत घेतल्यानंतर त्यावर प्रक्रिया केल्यानंतर नव्या किमतींनुसार आता अमूल शक्ती दूध हे ५० रुपये लिटर, अमूल गोल्ड ६२ रुपये प्रति लिटर आणि अमूल ताजा ५६ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा आता दूध उत्पादक शेतकर्यांना होईल मात्र, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसेल.
फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, अहमदाबाद आणि गुजरातमधील सौराष्ट्र विभाग, दिल्ली एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई इत्यादी ठिकाणी नवीन किंमती लागू होतील. मदर डेअरीने प्रति लिटर २ रुपयांची वाढ केल्यानंतर फुल क्रीम दुधाला ६१ रुपये, टोन्ड दुधाला ५१ रुपये प्रति लिटर आणि डबल टोन्डला ४५ रुपये, तर गाईच्या दुधाला आता ५३ रुपये प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत. स्थानिक पातळीवर मात्र फॅटनुसार दर हे ठरवून दिले गेले आहेत.