मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकर्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले.
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकर्यांना बसला आहे. जिल्हाधिकार्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकर्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
शेतकर्यांसाठी राज्य मंत्रिमंडळात झालेले महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे
१) भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी. एकूण ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी. भूविकास बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करणार. (सहकार विभाग)
२) महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क संस्थेस अनुदान स्वरुपात निधी देणार. शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य. (पणन विभाग)
३) बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता. १९१८ हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा. (जलसंपदा विभाग)
४) महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत २०० कोटींची तात्पूरती वाढ करण्याचा निर्णय. (वित्त विभाग)
५) १२५० मे टन प्रतिदिन गाळप क्षमता २५०० मे.टन पर्यंत वाढविण्यासाठी शासकीय भागभांडवल देणार. (सहकार विभाग)