मुंबई : राज्यात निसर्गाचा लहरीपणा व अन्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे अनेक घोषणा होत असल्या तरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकर्यांना भावनिक पत्र लिहून आत्महत्या करु नये म्हणून शिवछत्रपतींची शपथ घातली आहे. तसेच शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेत शिवार ते बाजारपेठेपर्यंत असणारी संपूर्ण दर्जात्मक साखळी तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. किसान उत्पादक समूहास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केले जाईल. महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबतचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर केले जाईल. असेही शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केंद्राच्या योजनांची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी सुनियोजित पध्दतीने कार्य केले जाईल. अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिट सक्षम करुन जलद गतीने दिशा देण्याचे काम केले जाईल. जैविक शेती व नैसर्गिक शेतीसंदर्भात केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील जेणेकरुन आपली शेती विषमुक्त होईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.