पंढरपूर – तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रूपये खर्च करून हाता तोंडाशी आलेल्या द्राक्ष घडावर किडे,मुंग्या,अळी व किटकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ऑमकोपेस्टीसाइट कंपनी चे किटकनाशक औषध पायरीबॅन डस्ट ची द्राक्ष बागेवर धुरळणी केल्यानंतर द्राक्ष घड सुकणे, करपणे, द्राक्ष वेलीची शेंडे जळणे काड्या दुभागणे तसेच द्राक्ष मणी चिरणे व डाग येणे, असे प्रकार होऊन कोट्यावधी रुपयांचे द्राक्ष बागाचे नुकसान झाले आहे, त्वरित महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार यशवंत माने यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे.
मोहोळ मतदारसंघातील नुकसान ग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करणार आहे. अशी ग्वाही नुकसान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देवून आमदार यशवंत माने यांनी धीर दिला.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव भागासह मोहोळ विधानसभा मतदारसंघासह येणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली, मगरवाडी, विटे, पुळुज भागात या औषधाचा मोठा परिणाम झाला आहे. आधीच दोन वर्षे कोरोनामुळे सर्व बाजारपेठा बंद राहिल्या. शेतीमालाला योग्य दर मिळत नव्हता. त्यात आता अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमिनीची माती वाहून गेली. नुकसानीनंतर झालेल्या पंचनाम्याची रक्कम अजूनही मिळालेली नाही.
तरीही सर्व संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या उमेदीने फळ पिके घेण्यास सुरुवात केली. परंतु आता मात्र या हवामान बदलामुळे द्राक्ष पिकांचे सर्वांत जास्त नुकसान होत आहे. सकाळी ढगाळ हवामान असते. कधी ऊन पडते, तर कधी सरी बरसतात. पावसाच्या भीतीने काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक कागद अंथरले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास जाऊ नये म्हणून औषध फवारणी करावी लागत आहे. औषध फवारणीचा खर्च जास्त होत आहे. त्यामुळे द्राक्ष पीक घेणारे शेतकरी हतबल झाले आहेत.
तरी त्वरित नुकसान भरपाई द्यावी व कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यानी केली होती. याची तातडीने दखल घेत महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करून माझ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार यशवंत माने यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा :