मुंबई : शेती व्यवसायातून उत्पादन आणि उत्पादनातून उद्योग या धोरणाअंतर्गत केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना हाती घेतली आहे. यात तरुण शेतकर्यांना १० लाखापर्यंतचे अनुदानही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उद्योजकांच्या सोई करीता एक जिल्हा एक उत्पादन असे योजनेचे स्वरुप असले तरी इतर पिकांसाठी नविन प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी लाभ घेता येणार आहे. शेतीचे उत्पन्न वाढविण्यासह तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.
या योजनेकरिता ना शिक्षणाची अट आहे ना कुण्या कागदपत्रांची. शेतकर्यांबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकरी संस्था, निर्यातदार शेतकरी, स्वयंसहाय्यता बचत गट, शासकीय संस्था हे अर्ज करु शकणार आहेत. केवळ वयाची १८ वर्ष पूर्ण असणार्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
उद्योगाच्या स्वरुपानुसार त्याचे अनुदान ठरविण्यात आले आहे. पॅकेजिंग, विपणन आणि ब्रँडिंगसाठी ५० टक्के अनुदान, कौशल्य प्रशिक्षण व भांडवल अनुदान प्रती बचत गटास ४ लाखाचे बीज भांडवल तसेच या योजनेतून उद्योग करणार्यांना रोजगाराची संधीही उपलब्ध करुन देता येणार आहे.
शेतकरी किंवा संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून सर्व माहिती मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संसाधन व्यक्तीच्या मदतीने https;//pmfme.mofpi.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. शिवाय अडचण आल्यास कृषी सहाय्यक किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे.