मुंबई : राज्यातील कृषी योजना मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी अधिकार्यांना दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाला जागतिक बँकेने ३ हजार कोटांचे सहकार्य केले आहे. त्यामुळे निधीची चिंता नाही. आगामी काळात हे काम जलदगतीने पूर्ण व्हावेत यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत.
केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकर्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, ज्या कृषि योजना आहेत त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शिवाय वेळेत योजना मार्गी लागल्या तर त्यामधील निधीही परत जात नाही. शेतकर्यांच्या विकासाच्या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हा महत्वाचा आहे. त्यामुळे याला गती दिली तरी शेतकर्यांचे जीवनमान बदलणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील शेतकर्यांसाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यळबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी सर्व त्या प्रकारचे पाठबळ दिले जाईल. ग्रामीण स्तरावर कार्यरत विविध यंत्रणाशी समन्वय ठेवून हा प्रकल्प राबविण्यात यावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.