पुणे : राज्यात किंवा देशात एखाद्या भागात भातशेती केली जात असेल तर त्यात विशेष असे काही म्हणता येणार नाही मात्र एखाद्या भागात जेथे दुष्काळी परिस्थिती आहे तेथे भातशेतीचा प्रयोग करण्यात आला तर ती मोठी बातमी ठरते. मात्र या पलीकडे जावून चीनने चक्क अंतराळात भातशेतीचा प्रयोग केला आहे. यामुळे याची जगभरात चर्चा झाली नसती तर नवलच ठरले असते.
चिनी विज्ञान अकादमीने (सीएएस) सीजीटीएन वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या तिआनगोंग अंतराळ स्थानकातील झिरो-ग्रॅव्हीटी लॅबमध्ये चीनी अंतराळवीरांनी धान अर्थात भाताच्या दाण्यापासून रोप उगविण्याचा प्रयोग केला. त्यात त्यांना मोठे यश आले आहे. एका महिन्यात धानाची रोपे ३० सेंटीमीटर व छोट्या देठाची भाताची रोपे ५ सेंटीमीटरपर्यंत वाढले. याशिवाय त्यांनी थेल क्रेस नामक एक वनस्पतीही उगवण्यात यश संपादन केले आहे. ही वनस्पती पत्तागोभी व ब्रसल्स स्प्राउट सारख्या हिरव्या पालेभाज्यांचे प्रतिनिधित्व करते.
अंतराळात उगवण्यात आलेली रोपे वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरपर्यंत पृथ्वीवर आणली जातील. ही रोपे वाढण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल. त्यानंतर त्यांची तुलना पृथ्वीवर उगवण्यात आलेल्या धानाच्या रोपांशी केली जाईल. गतवर्षी जुलै महिन्यातही चिनी संशोधकांनी अंतराळात बियाण्यांपासून उगवण्यात आलेल्या धानाच्या पहिल्या बॅचची काढणी केली होती. त्यांनी चांग ए-५ मोहिमेसोबत ४० ग्रॅम तांदूळ पाठवले होते. त्यानंतर पृथ्वीवर त्यांची शेती करण्यात आली होती.