शेत शिवार । नाशिक : गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. आता कुठे रब्बी हंगामातील पिकांची उगवण झाली होती. पण ढगाळ वातावरण आणि अवकाळीमुळे उगवणीबरोबरच पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. तर बुरशीचेही प्रमाणात वाढत आहे. ढगाळ वातावरणामुळे सकाळच्या प्रहरी धुई पडत आहे. वातावरणातील बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव हा पिकांवर होत आहे. या ढगाळ वातावरणाचा फटका फळबागांना देखील बसत आहे. यामुळे योग्य पध्दतीने पिकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
मध्यंतरी अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते तर आता अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम रब्बीसह सर्वच पिकांवर आणि फळबागांवर होत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी अद्यापही पेरणी पूर्ण झालेली नाही. दिवाळीनंतर तापमानाचा पारा घसरल्याने पेरणीस पोषक वातावरण निर्माण झाले होते पण पुन्हा आता ढगाळ वातावरण आणि अवकाळी यामुळे पेरण्या रखडलेल्या आहेत. शिवाय तुर आणि कापूसावरही किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादनात घट होणार आहे.
असे करा पिकांचे व्यवस्थापन
वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहेे. नुकत्याच उगवलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव अधिक काळ राहिल्यास पिकांच्या वाढीवर आणि परिणामी उत्पादनावर परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याने वेळीच किडीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारची किटकनाशके उपलब्ध असून वेळीच त्याची फवारणी करणे आवश्यक झाले आहे. अळी नाशकात फिनॅाफॉस हे किटकनाशक आहे तर प्रोफ्रेनाफॅस साफरमेथ्रीन किंवा कोरॅझिन हे प्रभावी किटकनाशक आहे.
फळबागांनाही फटका
वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ रब्बी हंगामातील पिकांवरच नाही तर फळबागा आणि खरिपातील तूर, कापसावरही होत आहे. आंब्याला आता मोहर लागला आहे. यावर बुरशी वाढत असल्याने त्याचे नियंत्रण करणे गरजेचे झाले आहे. द्राक्षामध्ये मनीगळ सुरु झाली आहे. तर मर रोगाचाही प्रादुर्भाव वाढत आहे. थंडी आणि दमट वातावरणामुळे हरभरा, ज्वारी, फळबागामध्ये द्राक्ष यावर दावणी रोग हा वाढत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर आंबा, द्राक्ष या फळबागांवर देखील किटकनाशक आणि रोगनाशक हे एकत्रित मिसळून फवारणी केली तरच उत्पादन शेतकर्यांच्या पदरी पडणार आहे.