पुणे : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घडत असलेल्या घडामोडींमुळे शेतमालाच्या भावांमध्ये चढ उतार अजूनही पहायला मिळत आहे. २०२१च्या प्रारंभापासून उच्चांकी पातळीवर पोहचलेल्या काही शेतमालाचे दर आता २०२२च्या मध्यांनात कमी होण्यास सुरुवात झाली आहे. गत सहा महिन्यात शेतीमलाचे दर ६ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत. प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास कापूस व हळदीच्या दरात घसरण झाली आहे. मात्र त्याच गहू आणि तांदूळाचे भाव वाढत आहेत.
कापूस :
२१ जूनला कापूस उच्चांकी दरापासून ७.१३ टक्क्यांनी नरमला. सध्या कापसाला ४६ हजार ५७० रुपये प्रतिगाठी दर मिळत आहे. एक कापूस गाठ १७० किलोची असते. सरकी पेंडेचे दर २३ टक्क्यांनी कमी झाले. कापड उद्योगाकडून मागणी घटल्याने कापसाचे दर नरमले. सध्या शेतकर्यांकडे नगण्य कापूस असेल. त्यामुळे शेतकर्यांना याचा फटका बसणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.
हळद :
यात सर्वांत मोठी घसरण ही हळदीच्या दरात झाली आहे. हळदीचे दर उच्चांकी दराच्या तुलनेत सध्या ३१ टक्क्यांनी नरमले. हळदीचे दर ११ हजार १४८ रुपयांवरून ७ हजार ७३६ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
गहू :
चालू हंगामात वाढलेल्या उष्णतेमुळे गहू उत्पादनाला फटका बसला. त्यामुळे केंद्राने मे महिन्यात गहू निर्यातीवर बंदी आणली. परंतु गहू निर्यातबंदी होण्याआधी देशातून मोठ्या प्रमाणात निर्यात झाली. मागील वर्षात देशातून ७२ लाख ३९ हजार टन निर्यात झाल्याचे सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. देशातून एवढा गहू निर्यात झाल्यामुळे बाजारात दर हमीभावापेक्षा अधिक आहेत. याचा शेतकर्यांना लाभ मिळत आल्याचे जाणकारांनी सांगितले.
तांदूळ :
जगात सध्या जगभरात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गव्हाचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे अनेक देश तांदळाचा वापर वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांदळाचे दरही वाढण्याची शक्यता व्यापार्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
सोयाबीन आणि मोहरी
काही दिवसांपूर्वी खाद्यतेलाचे दर तेजीत होते. परिणामी तेलबियांनाही चांगला दर मिळाला. देशात सोयाबीन आणि मोहरी ही दोन महत्वाची तेलबिया पिके आहेत. यंदाच्या हंगामात सोयाबीनसह मोहरीचाही दर तेजीत आहे. मोहरीला यंदा सरकारने ५२०० रुपयांचा हमीभाव जाहिर केला. परंतु सध्या मोहरीला ६ हजार ते ६२०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी खुल्या बाजारात मोहरीची विक्री करत आहेत.