नागपूर : कापसावरील (Cotton) बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे दरवर्षी उत्पादनात मोठी घट होत असते. गुलाबी बोंडअळीमुळे कापसाच्या उत्पादनात तब्बल ५० घट ही ठरलेली आहे. त्यामुळेच देशात कापसाचा तुटवडा निर्माण होत आहे. मात्र आता बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधम संस्थेच्या माध्यमातून आयआरएम अर्थात इनसेक्ट रजीस्टंन्स मॅनेजमेंट हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यामुळे ३० टक्के बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यात संस्थेला यश आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यंदाच्या हंगामात राज्यात ४० लाख हेक्टर क्षेत्रफळावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. असे असले तरी कापूस निसर्गाचा लहरीपणा आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव याचा धोका कायम कापसाला राहिलेला आहे. आता कापूस संशोधन संस्थेकडून हा उपक्रम राबवला जाणार असल्याने उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आहे. चंद्रपूर, वर्धा, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नांदेड, परभणी, जालना, अकोला या जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पांची अंमलजावणी होणार आहे.
केवळ कापसावरच नाहीतर बोंडअळीमुळे इतर पिकांच्या उत्पादनावरही परिणाम झालेला आहे. यामुळे प्रक्रिया उद्योजकांना चढ्या दराने कापसाची खरेदी करुन उद्योग सुरु ठेवावे लागत आहेत. यंदा मात्र, केंद्रीय कापूस संस्थेने घेतलेला उपक्रम जर यशस्वी झाला तर कापूस पिकाबाबत चित्र हे बदललेले असेल असा विश्वास आहे. यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकर्यांचा जीव भांड्यात पडला आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर शेतकर्यांना मोठा फायदाच होणार आहे.