औरंगाबाद : उन्हाळी हंगामात भुईमूग, सोयाबीन आणि राजमा ही पिके वावरात आहेत. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात वाढत्या उन्हामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत तर दुसरीकडे पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्याने अजून महिनाभर पाणी कसे टिकवून वापरावे हा मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे. दुसरीकडे लोडशेडींगचे संकट आ वासून उभे आहे. सध्या कृषी पंपासाठी ७ तास विद्युत पुरवठा केला जात आहे. त्याच अनुशंगाने पाणी देण्याची कामे उरकून घ्यावी लागत आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात उन्हाळी हंगामातील पिके अडचणीत आहेत.
उन्हाळी हंगामात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा झाला आहे. सोयाबीन हे पावसाळी म्हणजेच खरिपातील पीक आहे. त्यामुळे या पिकाला अधिकच्या पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात मुबलक पाणीसाठा होता पण वाढत्या उन्हामुळे पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. आता उर्वरीत काळात पिके जोपासायची कशी हा प्रश्न आहे.
सोयाबीन शेंग भरण्याच्या अवस्थेत आहे. अशातच पाणी कमी पडले तर थेट उत्पादनावरच परिणाम होणार आहे. उशिरा पेर झालेल्या सोयाबीनला परिपक्व होण्यासाठी अजून ३ आठवड्याचा कालावधी आहे. त्यामुळे शेतकर्यांनी केवळ पाण्याचे योग्य नियोजन केले तरी उत्पादनात वाढ होणार आहे. याची काळजी शेतकर्यांनी घेण्याची आवश्यकता आहे.