जळगाव । नाशिक : अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. पंधरा दिवसांपूर्वीही ढगाळ वातावरण होते. त्यावेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे द्राक्ष बागांची कूज आणि गळ झाली. आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकर्यांवर संकटच कोसळले आहे. त्यामुळे द्राक्षाच्या मण्यांना तडे जाऊ शकतात. सोबतच भुरी, डाऊनी, गळ, कूज या समस्या पुन्हा डोके वर काढण्याची भीती व्यक्त होत आहे. याचा द्राक्ष पिकावर गंभीर परिणाम होणार आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक धास्तावले आहेत. डिसेंबरमध्ये आंब्याला मोहोर येतो. आता या पावसाने मोहोर काळवंडळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर देखील होण्याची शक्यता आहे.
एक एकर द्राक्षबाग उभारण्यासाठी सहा लाखांचा खर्च यतो. कीटकनाशकांची फवारणी, रासायनिक, जिवाणू आणि अन्न मूलद्रव्ये अशी विविध खते, मजुरी यासाठी लागणारा खर्चही वेगळा करावा लागतो. एक एकर द्राक्ष बागेसाठी किमान तीन लाख रुपयांचा खर्च येतो. यासाठी येथील शेतकर्यांनी बँकांची कर्जे काढली आहेत. अतिवृष्टी आणि आता कीडरोग यामुळे शेतकर्यांच्या पदरी काहीच पडणार नसल्याने शेतकर्यांचे टेन्शन वाढले आहे.
सांगली व पंढरपूरला द्राक्ष बागांमध्ये पाणी
सांगली जिल्ह्यातील पूर्व भागासह पूर्ण जिल्ह्यातील काढणीला आलेले आणि फुलोर्यात असणार्या द्राक्ष बागांचे पावसाने मोठे नुकसान झाले. तासगाव, पलूस, मिरज, कडेगाव परिसरात पावसामुळे ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असून, द्राक्षांचे घड कुजण्याच्या स्थितीत आहे. पंढरपूरलाही अशीच परिस्थिती आहे. कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकर्यांकडून सुरू आहे.