नाशिक : मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या. मात्र अशा अस्मानी संकटातही नाशिक जिल्ह्यातील खिरमणी येथील शेतकर्याने तब्बल ३ एकरातील द्राक्ष बागेचे सरंक्षण केले आहे. क्रॉप कव्हरचा वापर केल्याने बाग वाचवत अपेक्षित उत्पादन देखील या शेतकर्याला मिळणार आहे. तर जाणून घेवूया नेमकं काय आहे क्रॉप कव्हर आणि कसा होतो त्याचा उपयोग?
द्राक्षे बागेतून अधिकचे उत्पादन मिळत असले तरी बाग जोपासण्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो. खर्च करुनही अंतिम टप्प्यात निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या नुकसानी पासून वाचण्यासाठी काही प्रगतीशिल शेतकरी क्रॉप कव्हरचा वापर करतात. यात प्लॅस्टिक कागदाचे पिकांवर अच्छादन केले जाते. क्रॉप कव्हर तशी खर्चिक बाब असल्यामुळे शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात पण खिरमणी येथील हंसराज भदाणे यांनी केवळ तीन एकरातील थॅामसन जातीच्या द्राक्ष बागेला क्रॉप कव्हर वापरले आहे. यामुळे मुबलक प्रमाणात सुर्यप्रकाश मिळाला आहे. शिवाय रोगाचा प्रादुर्भाव हा कमी झाला आहे. पाऊस आणि गारपीटीपासून संरक्षण झाले आहे तर आता निर्यातक्षम द्राक्षांना अधिकचा दर मिळणार आहे. यामुळे तीन एकरातील बाग तर वाचली आहे.
प्लॅस्टिक अच्छादनासाठी एकरी ४ लाखाचे अनुदान
द्राक्षाच्या अच्छादनासाठी प्रशासकीय स्तरावर अनुदानाची योजना आहे. प्लॅस्टिक पेपरसाठी एकरी २ लाख ५० हजार ते ३ लाख, अँगल व तारा बांधणी यासाठी १ लाख असा प्रति एकरसाठी ४ लाख खर्च प्रस्तावित आहे. तुलनेत मागणीनुसार शासनाने जर निम्मे ५० टक्के अनुदान दिल्यास मोठी मदत झाली असती. पण याबाबत प्रशासकीय स्तरावर कोणताही निर्णय वेळेत झाला नाही. परिणामी शेतकर्यांना मोठा फटका बसला. द्राक्ष बागांची तोडणी सुरु होताच अनुदनावर प्लॅस्टिक अच्छादन देण्याची मागणी अनेक शेतकर्यांनी केली होती. यामुळे द्राक्षाचे संरक्षण झाले असते. पावसापूर्वीच ४० टक्के द्राक्षाची काढणी कामे झाले होती. उर्वरीत द्राक्षे ही या प्लॅस्टिक अच्छादनात सुरक्षित राहिली असते. मात्र, अनुदानाची मागणीकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.