नाशिक : राज्यातील हवामान विभागाने तीन दिवस राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या नैताळे येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. जवळपास दीड तास झालेल्या पावसात शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले असून मका, सोयाबीन, टोमॅटो आणि नुकतीच छाटणी झालेल्या पिकाची अक्षरशः दैना झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षी सिन्नर, नाशिक, दिंडोरी, कळवण, नांदगाव, येवला आणि चांदवड या भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागे झालेल्या पावसानंतर नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे झाले त्याची मदतही अजून पदरी पडलेली नसल्याने पुन्हा मुसळधार पाऊस पडू लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अनेकांची पिके वाहून गेली आहेत तर द्रकशाबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या दीड तासांमध्ये द्राक्ष बागांचं तळ्यात रूपांतर झाले होते. एकूणच दीड तासांत आलेल्या पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.