सिंधुदुर्गनगरी : वादळी वाऱ्यासह सलग तीन दिवस झालेल्या पूर्वमोसमी पावसाने आंबा, काजू बागायतदारांचे अक्षरशः रडवले आहे. जिल्ह्यातील शेकडो एकर आंबा आणि काजू बागांचे वादळाने नुकसान झाल्याने, उर्वरित हंगामात काही उत्पादन मिळेल या आशेवर असलेल्या बागायतदारांची घोर निराशा झाली आहे.
अवकाळी पाऊस, सतत ढगाळ वातावरण, वाढलेले तापमान अशा अनेक नैसर्गिक संकटाचा सामना जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांनी केला. आंबा, काजूची झाडे मोहरत असतानाच या वर्षी डिसेंबरमध्ये सतत २० दिवस अवकाळी पाऊस पडला. त्यानंतर जानेवारीत ढगाळ वातावरणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. त्यानंतर बदलत्या वातावरणातून काहीशी सुटका मिळेल, असे वाटत असतानाच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पावसाची अवकृपा जिल्ह्यावर झाली. त्यामध्ये आंबा, काजूचे मोठे नुकसान झाले.
आंबा उत्पादन चांगले येण्यासाठी बागायतदारांनी किमती रासायनिक, सेंद्रिय खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडांना घालतात. याशिवाय कीड-रोग नियत्रंणासाठी महागड्या कीटकनाशकांचा वापर करतात. याशिवाय व्यवस्थापनावर लाखो रुपये बागायतदार खर्च करीत असतात. मात्र आता बागांवर केलेला खर्चदेखील उत्पादनातून निघणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या आंबा पीक काही ठिकाणी काढणी स्थितीत आहे तर काही ठिकाणी फळे अद्यापही लहान आकाराची आहेत. पावसामुळे या फळांवर करप्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागायतदारांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने बुरशीनाशकांची फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कागलमध्ये गारपिटीचा फळबागांना फटका
कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पावसाचा तडाखा सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाच्या जोरदार तडाख्याने कागल तालुक्याला मोठा फटका बसला. तालुक्यातील नानीबाई चिखली, कौलगे, खडकेवाडा, लिंगणूर कापशी येथील शेतकऱ्यांकडून भाजीपाला पिकेदेखील घेतली जात आहेत. यात पपई, कलिंगड, कारले, दोडका, टोमॅटो, मिरची, फ्लावर, कोबी आदी पिके घेतली जातात. काही जणांनी तर दोन, पाच, दहा एकरांमध्ये पिके घेतलेली आहेत. हातातोंडाशी आलेल्या भाजीपाला पिकांची बुधवारी (ता. ६) वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने माती केली. काही पिके उमलण्याआधीच मातीत मिसळली. हाताशी आलेली पिके उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी भाजीपाला पिके उद्ध्वस्त झाली आहे. जोरदार गारपीटही आलेल्या पावसाने भाजीपाला व अन्य पिकांचे मोठे नुकसान केले. गारांचा आकार मोठा असल्याने गारांचा फटका फळबागांना बसला. अनेक पक्व फळे पगाराच्या माऱ्यामुळे फुटली. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.