पुणे : शेतीत प्लास्टिक मल्चिंगचा वापर अलीकडच्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. किडीपासून बचाव, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, तापमानापासून पिकांचे संरक्षण अशा अनेक कारणांसाठी शेतकरी प्लस्टिक मल्चिंगला प्राधान्य देतात. प्लास्टिक मल्चिंगबाबत नुकतेच एक संशोधन समोर आले आहे. प्लास्टिक मल्चिंगमुळे देशातील अनेक भागांतील मातीत मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक आढळून आले आहे. टॉक्सिक लिंक या पर्यावरणवादी संस्थेने केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे.
या नव्या संशोधनानुसार, प्लास्टिक मल्चिंगमुळे जमिनीतील मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण वाढते तसेच अन्न दूषित होते, त्यामुळे मानवासाठीही घातक ठरत आहे. प्लास्टिक प्लॅटफॉर्मवर वापरले जाणारे प्लास्टिक सामान्यत: कमी-घनतेचे असतात. त्यामुळे हे प्लास्टिक मानवाच्या फुफ्फुसात आणि रक्तामध्ये देखील प्रवेश करते. मानवी रक्तामध्येही पहिल्यांदाच मायक्रोप्लास्टिक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
मातीच्या नमुन्यांमध्ये जड धातूंचे अस्तित्वही आढळून आल्याचेही अहवालात आढळून आले आहे. आर्सेनिक, शिसे, बोरॉन आणि कॅडमियम यांचे प्रमाणही अधिक असल्याचे आढळून आले. ओल्या जमिनीतील धातूंचे वजन आणखी वाढलेले आढळून आले. यामुळे मायक्रोप्लास्टिकमुळे माती आणि पर्यावरणाची तर हानी होतेच पण मानवी आरोग्यासाठीही हे धोकादायक आहे.