मुंबई : परतीच्या पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. याच मुद्यावरुन विरोधीपक्षाने शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केले आहे. शिंदे-भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे. हे सरकार शेतकर्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार आहे. यामुळे दिवाळीनंतर विद्यमान सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात येणार असून, राज्यपालांकडे यासंदर्भात भूमिका मांडली जाणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यावरुन राज्यात जोरदार राजकीय वादळ निर्माण झाले आहे.
महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक आपत्तीत शेतकर्यांना १० हजार रुपयांची रोख मदत आणि नंतर १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. शेतकर्यांच्या खात्यात पैसा जमा केला होता. विद्यमान सरकारने नियमांचे अडथळे निर्माण करून शेतकर्यांना मदत देत नाही. शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. परण शिंदे-भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा एक रुपयादेखील शेतकर्यांपर्यंत पोहोचला नाही. राज्यातील शेतकर्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकर्यांना जास्त झळ सोसावी लागत आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांचे नाना पटोलेंना उत्तर
अन्नदाता शेतकर्याला वार्यावर सोडणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. अन्नदाता शेतकरी आज संकटात आहे. त्याला शिंदे सरकार वार्यावर सोडणार नाही. हे सरकार कायम शेतकरी, कष्टकर्यांच्या पाठिशी उभं आहे. आताही आम्ही शेतकर्यांच्या पाठिशी आहोत. आम्ही त्यांना नक्की मदत करू. विरोधी पक्षाचं कामचं टीका करणं आहे. त्यामुळे नाना पटोलेंनी टीका केली. त्यांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.