मुंबई : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाडे पाहिले जाते. पण हा जोड व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. हिरवा चार्याचा तुटवडा आणि पशूखाद्यांचे वाढते दर यामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे. त्यामुळे आता कांद्यापाठोपाठ दुधालाही हमीभाव देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. जनावरांचा चारा म्हणून कडब्याचा वापर केला जातो. पण ज्वारी २ हजार रुपये क्विंटल तर त्याच बरोबरीने कडब्याचे दर आहेत. यामुळे शेतकर्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
जनावरांचा चारा, पशुखाद्य आणि औषधे खूप महाग झाली आहेत, तर त्या तुलनेत दुधाच्या किंमतीत वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत पशुपालन खूप महाग झाले आहे. दुधाच्या दरात वाढ झाली तरच या जोड व्यवसायाची शेतीला जोड देता येणार आहे. वाढत्या खर्चानुसार सरकारने दुधाला किमान आधारभूत किमतीच्या कक्षेत आणून दर निश्चित करावी. खर्चावर ५० टक्के नफा घेऊन किमान किंमत निश्चित करावी, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
गतवर्षी ६ ते ७ रुपयांना मिळणारी कडब्याची पेंडी यंदा १० रुपयांपर्यंत गेली आहे. दुसरीकडे अधिकचे उत्पादन मिळावे म्हणून कळणा, पेंड, सरकी यासारखे पशूखाद्य गरजेचे आहे. २० रुपये किलो असणारे हे पशूखाद्य आता ३८ रुपये किलोंवर गेले आहे. यासह जनावरांसाठी लागणार्या औषधांच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे शेतकर्यांना जनावरे सांभाळायची कशी? असा प्रश्न पडत आहे. वाढत्या महागाईला कंटाळून अनेक शेतकर्यांनी त्यांची दुभती जनावरे विक्रीला काढली आहेत.