नियमित कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याची मागणी

- Advertisement -

पुणे : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांनी शेती कर्जावरील 2 लाखावरील कर्जासाठी 2 लाख आणि नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून रक्कम देण्याची घोषणा केली होती. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी केली नाही.

त्यामुळे सदरची रक्कम शेतकर्‍यांना तत्काळ मिळावी अशी मागणी सिद्धपिंप्री सोसायटी चेअरमन भाऊसाहेब ढिकले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मागील विधानसभेच्या निवडणुकीप्रसंगी आमचे सरकार आल्यास शेतकर्‍यांना 2 लाखांवरील कर्जमाफी असणार्‍या शेतकर्‍यांना 2 लाखापर्यंत आणि 2 लाखांच्या आतील शेतकर्‍यांना 2 लाख रुपये कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजारांची मदत देण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीप्रसंगी देण्यात आले होते. साहजिकच हे दोन्ही पक्ष आता सत्तेत आले असून त्यांचेकडून अद्यापपर्यंत याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जमाफीच्या घोषणेमुळे जे शेतकरी कर्ज वेळेवर भरत होते त्यांनीही आपली कर्ज वेळेत भरली नाही. याला संपूर्ण जबाबदार आघाडी सरकार असून त्यामुळे सहकारी सोसायट्या दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. तसेच शेतकरी आपली कर्ज भरण्याची तयारी दाखवत असताना केवळ शासनाच्या नाकर्ते धोरणामुळे शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या आशावर बसला आहे.

त्यामुळे शासनाने जी घोषणा केली त्याचा तत्काळ विचार करून सोसायट्या जिवंत ठेवण्यासाठी जाहीर केलेली योजना देण्यात यावी. जर ही घोषणा झालीच नसती तर शेतकर्‍यांनी आपले कर्ज आतापर्यंत भरले असते. परंतु आपल्याला कुठेतरी 50 हजार, 2 लाख अशी मदत मिळेल या आशेवर शेतकरी  अद्याप थांबून आहे. त्यातच सध्या द्राक्ष कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. त्यामुळे दिवसागणिक शेती तोट्यात जात आहे

शेतकरी आणि सोसायटी या दोघांनाही जीवदान मिळावे यासाठी शासनाने जाहिर केलेल्या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी जि.प. सदस्य यशवंत ढिकले, तालुका संघाचे चेअरमन भाऊसाहेब ढिकले, संचालक दत्तू ढिकले, उत्तम राजोळे, जगन्नाथ ढिकले, राजेंद्र जाधव, सुखदेव पवार, राजेंद्र वराडे, मुख्य सचिव चंद्रभान शिंदे आदींसह सिद्धपिंप्री परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

हे देखील वाचा :

हे देखील वाचा