मुंबई : राज्यात पावसाने थैमान घातलेले आहे. खरिपाची पेरणी होताच अतिवृष्टी आणि पुरस्थिती निर्माण झाल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिरायत क्षेत्रावरील नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ५० हजार तर बागायतीला हेक्टरी १ लाखांची आर्थिक मदत करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे.
राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे संपूर्ण खरीप क्षेत्र धोक्यात आहे. दुबार पेरणीनंतर ही परस्थिती ओढावली आहे. गेल्या १५ दिवसांपासून ही स्थिती असताना कोणत्याही प्रकारची मदत शेतकर्यांपर्यंत पोहचलेली नाही. एवढेच नाही तर पंचनामे आणि पीक पाहणी देखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वार्यावर असून त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी जिल्ह्याच्या ना पालकमंत्री ना प्रशासकीय अधिकारी अशी स्थिती झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शेतकरी संकटात असल्याने यंदा चौकटीच्या बाहेर जावून त्यांना मदत करण्याची अपेक्षा असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जिरायतीला हेक्टरी ५० हजार तर बागायतीला हेक्टरी १ लाखांची मदत दिली तरच शेतकरी खर्या अर्थाने जगेल, यामुळे राज्य सरकारने सर्व निर्णय बाजूला ठेवून शेतकर्यांना मदत करण्याचा निर्णय आधी घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली आहे.