नागपूर : राज्यात यंदा विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असून यामुळं शेतीला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळं तब्बल ८ लाख हेक्टर क्षेत्रफळावरील पिकं यापार्श्वभूमीवर गडचिरोलीसह विदर्भात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी बांधावर जावून पाहणी केली. नुकसानीची दाहकता ही अधिक असून शेतकर्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत आणि ज्यांनी जीव गमवलेला आहे त्यांच्या कुटुंबियांना भरीव मदत केली तरच या नुकसानीच्या खुणा मिटणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, भामरागड आणि अहेरी भागातील गावांची पाहणी दरम्यान अजित पवार यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. नुकसानीच्या झळा ह्या तीव्र आहेत. केवळ औपचारिकता म्हणून मदतीची घोषणा करु नये तर त्या रकमचा खर्या अर्थाने शेतकर्यांना आणि मजुरांना मदत व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यापैकी अहेरी, सिरोंचा, भामरागड या भागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी पंचनामे करायला सांगून दहा ते बारा दिवस झाले तरी सगळीकडील पंचनामे झालेले नाहीत. आधारकार्ड व अर्ज फक्त घेतला आहे. परंतु पंचनामे केल्याशिवाय शेतकर्यांना मदत कशी देणार आहात याबाबत जिल्हाधिकार्यांकडे अजित पवार यांनी विचारणा केली.
विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात अजित पवार यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांची पिकं आणि बियाणे वाहून गेले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे राज्यात आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिस्थितीत सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अजितदादांनी केली आहे.