वर्धा : यंदा खरिप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत शेतकर्यांना मदतीचा हात देण्यासंबंधी आतापर्यंत अनेकांनी घोषणा केल्या असल्यातरी शेतकर्यांच्या पदरी अद्यापही ठोस मदत पडलीच नाही. हंगामाच्या सुरुवातीपासून अतिवृष्टीने राज्यात ठाण मांडले असल्याने या हंगामातून शेतकर्यांच्या हाती काहीच उरलेलं नाही. यामुळे शेतकर्यांना तातडीने मदत देण्याची आवश्यकता असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यात एका बैठकीत मोठी घोषणा केली आहे.
ज्या शेतकर्यांचे २ हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे अशा शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. एवढेच नाहीतर ६५ मिमी पावसाची अट ही शिथील करण्यात आली आहे. ज्या भागात ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस आहे पण त्यामध्ये सातत्य असल्याने नुकसान अधिकचे आहे त्या ठिकाणीही भरपाई दिली जाणार आहे. कृषीपंप आणि गावठाण याचे विद्युत फिडर हे वेगळे झाले आहेत. त्या ठिकाणी विद्युत पुरवठा हा सोलरवर करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा १२ तास लाईट उपलब्ध राहील असा अंदाज आहे. याकरिता ८८ कोटींचा प्रस्ताव असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.