औरंगाबाद : गत हंगामात सोयाबीनला विक्रमी दर मिळाला. यंदा सोयाबीनची विक्रमी लागवड झाली असली तरी अतिवृष्टीमुळे खरिप हंगामाला मोठा फटका बसणार आहे. मागील दोन तीन वर्षांचा अनुभव लक्षात घेता हवामान बदलाचा फटका खरिप हंगामात सोयाबीनला बसत आहे व नेमका सोयाबीन पीक काढणीच्या वेळेस म्हणजे ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. यामुळे बिजोत्पानलाही फटका बसत आहे. यापार्श्वभूमीवर आज आपण उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पक्वतेच्या अवस्थेत बियाणे भिजते व हेच बियाणे जर पुढील खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी वापरले असता उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. कारण पिक काढणीच्या वेळेस झालेल्या पावसामुळे आर्द्रता वाढून बियाण्यावर मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव येवून बियाण्याची उगवणशक्ती कमी होते तसेच सोयाबीनच्या बियाण्याचा अंकुर बाहेर असतो. त्यामुळे जास्त पावसात बियाणे भिजले तर अंकुर हा बियाण्यामध्ये कमजोर/मृत होतो व बियाणे उगवत नाही. या सारखे काही महत्वाची कारणे आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतःसाठी उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन घेवून पुढील हंगामाकरीता घरच्याघरी दर्जेदार बिजोत्पादन निर्मिती करावी. त्या करीता खालील सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादनासाठी आवश्यक बाबी :
१) जमीन : सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे. अत्यंत हलक्या जमीनीत सोयाबीनचे अपेक्षीत उत्पादन येत नाही.
जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमीनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. जमीनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे.
२) हवामान : सोयाबीन हे पीक सुर्यप्रकाशास संवेदनशील आहे. सोयाबीन पीकासाठी समशितोष्ण हवामान अनुकूल असते. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिकाची कायिक वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते. सोयाबीन पीक २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते, परंतू कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर फुले व शेंगा गळतात, शेंगाची योग्य वाढ होत नाही व दाण्याचा आकार कमी होतो.
३) वाण : पेरणीसाठी किमान ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे आवश्यक आहे. पेरणीसाठी वनामकृवि, परभणी विकसीत केलेल्या
एमएयुएस-७१, एमएयुएस-१५८ व एमएयुएस-६१२ या वाणांची किंवा महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरीने वकिसीत केलेल्या केडीएस-७२६, केडीएस-७५३ या वाणांची किंवा जवाहरलाल नेहरु कृषि विश्वविद्यालय, जबलपूर ने विकसीत केलेल्या जेएस-३३५, जेएस ९३-०५, जेएस २०-२९, जेएस २०-६९, जेएस २०-११६, या वाणांची निवड करावी. वरील वाण जर शेतकरी बंधूंनी खरीप २०२१ मध्ये पेरलेले असतील व त्या बियाण्याची उगवणशक्ती चांगली असेल तर घरचे बियाणे स्वच्छ करुन बिज प्रक्रिया करुन पेरणी करावी.
४) बिजप्रक्रिया : सोयाबीनवर विविध रोग येतात व त्यामुणे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. रोग आल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी घेण्यापेक्षा पेरणीपूर्वीच बिज प्रक्रिया केल्यास रोगाचे व्यवस्थापन व्यवस्थीतरित्या होते. सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी मिश्र बुरशीनाशक उत्पादन कार्बोक्झीन ३७.५% — थायरस ३८.५% ची (व्यापारी नाव – व्हिटावॅक्स पॉवर) ३ ग्रॅम प्रति कि.ग्र. बिज प्रक्रिया करावी. या बिजप्रक्रियेमुळे सोयाबीनचे कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील इतर रोगांपासून संरक्षण होते. या शिवाय बिजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी (८-१० ग्रॅम/कि.ग्रॅ.बियाणे) चा वापर सुध्दा करावा. या बुरशी नाशकांच्या बिज प्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत (ब्रेडी
रायझोबियम) — स्फुरद विरघळणारे जिवाणू खताची (पीएसबी) २५० ग्रॅम प्रति १० कि.ग्रॅ. किंवा १०० मिली/१० कि.ग्रॅ. (द्रवरुप असेल तर) याची बिजप्रक्रिया करावी.