पुणे : आंबा प्रेमींचा सर्वात आवडता आंबा कोणता? असा प्रश्न विचारल्यावर बहुतांश जणांची पसंती हापूस आंब्यालाच असते. त्यातही देवगड हापूस म्हणजे खवय्यांची पर्वणीच. हापूस आंब्याची पेटी २ हजारांपासून ५ हजारांपर्यंत मिळते. मात्र जर एका आब्यांची किंमत तब्बल १ हजार रुपये आहे, असे कुणी सांगितल्यास विश्वास बसेल का? आंब्यांची महाराणी म्हणून ओळखला जाणारा ‘नुरजहाँ’ आंब्याची किंमत १ हजार रुपये प्रति नग असते. विशेष म्हणजे आंबा झाडावरच असतांना त्याची बुकिंग करावी लागले. नंतर तो आंबा मिळत नाही.
आपल्या वेगळ्याची चवीमुळे व वजनामुळे प्रसिध्द असलेल्या नुरजहाँ या आंब्याला मोठी मागणी असते. मात्र हा आंबा भारतात केवळ एकाच ठिकाणी पिकतो. मूळचा अफगाणिस्तानातील मानल्या जाणार्या या आंब्याची लागवड गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यातील काठीवाडा भागातच केली जाते. हा आंबा एक फूट लांबीपर्यंत वाढू शकतो आणि त्याचे वजन ३ ते ४ किला दरम्यान असू शकते.
काठेवाडा येथील आंबा उत्पादक शिवराजसिंह जाधव यांच्या बागेमध्ये नुरजहा आंब्याच्या तीन झाडे आहेत. त्यावर साधारणत: २५० फळे येतात. जानेवारी -फेब्रुवारीपासून या झाडांना मोहोर येण्यास सुरुवात होते आणि जूनपासून आंबे पिकून तयार होण्यास सुरुवात होते. यावर्षी हवामान बदलांच्या दुष्परिणामांमुळे नुरजहा आंब्याची मोहर झाडावर तग धरू शकले नाही आणि फळात रूपांतर होण्यापूर्वी खाली पडली असे त्यांनी सांगितले. हा आंबा झाडावर असतांनाच याचे बुकिंग केले जाते.