औरंगाबाद : विदेशी फळ अशी ओळख असलेल्या ड्रॅनग फ्रूटची (Dragon fruit) शेतीचा प्रयोग महाराष्ट्रातील काही प्रगतीशिल शेतकरी करतांना दिसत आहेत. साधारणत: २ ते ५ एकरावर होणार्या ड्रॅगन फ्रूट लागवडीविषयी आपणापैकी अनेकांना माहिती आहेच मात्र औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल जिल्ह्यात १०० एकरांवर ड्रॅगन फ्रूटची बाग ब्रह्मगव्हाण शिवारासह विविध भागांत फुलवण्याचा धाडसी प्रयोग करण्यात आला आहे.
ड्रॅगन फ्रूटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईन बनते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेसपॅक म्हणूनही वापर होतो. त्याच्या प्रक्रिया उद्योगासाठीही येथील काही समूहांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर गंगामाई कृषी उद्योगाचे चेअरमन पद्माकर मुळे यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मगव्हाण शिवारात ड्रॅगनची लागवड करण्यात आली. त्या फळांची आता काढणी सुरू आहे.
सिमेंटचे साडेसात फुटांचे चार इंच बाय चार इंच मजबूत पोल शेतावरच बनवले. त्यानंतर ट्रॅक्टरच्या साह्याने अडीच फुटांची रुंद सरीत दहा बाय दहा फुटांवर दीड फूट खोल पोल माती मुरुमात रोवण्यात आला. त्यावर २०० एमएमची सळई टाकून प्रत्येक दीड फुटावर बांबूचा आधार देण्यात आला. दोन पोलमध्ये एक फुटांच्या अंतरावर दोन रोपे लावण्यात आली आहेत. बेडमध्ये १० टन शेणखतात १ टन मळी मिश्रण करून दहा फुटांमध्ये तीन टोपले सुमारे ३० किलो भरण्यात आली. त्यानंतर लागवड केली.
शेतकर्यांना हेक्टरी १ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान
ड्रॅगन फ्रूट लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत कृषी विभाग ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी शेतकर्यांना हेक्टरी १ लाख ६० हजार रु. अनुदान देणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ९६ हजार (६० टक्के) तर दुसर्या आणि तिसर्या टप्प्यात २० टक्के अनुदान दिले जाणार आहे.