अवकाळी पावसाने बुडविले पण खरिपातील या तीन पिकांनी शेतकऱ्यांना तारले!

- Advertisement -

औरंगाबाद : अवकाळी पावसामुळे यंदा खरिपातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी संपूर्ण शेतच पाण्याखाली आले. या नैसर्गिक संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. कापूस, सोयाबीन, तूरीसह अनेक पीकांच्या उत्पादनातही मोठी घट झाली. या संकटात घडलेली दिलासादायक बाब म्हणजे, उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारपेठेत शॉर्टेज निर्माण होवून काही पीकांचे दर वाढले. याचा फायदा शेतकर्‍यांना होत आहे.

खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस आणि तूरीची बाजारात आवक सुरु झाल्यानंतर सुरुवातीला पीकांना योग्य दर नव्हता. यामुळे अनेक शेतकर्‍यांनी शेतमालाची विक्री करण्याऐवजी साठवणुकीवर भर दिला. याचा परिणाम दरावर झाला.

कापसाला सुरुवातीला ७ ते ८ हजारांदरम्यान भाव मिळत होता. मात्र आता कापसाच्या दराने १० हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. नजिकच्या काळात हा दर स्थिर राहण्याची किंवा त्यात वाढ होण्याची शक्यता बाजारपेठेतील तज्ञांकडून वर्तवली जात आहे.

सोयाबीन अनेक दिवस ४ हजार ५०० रुपयांवर स्थिरावले होते. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा होत गेली ती आज ६ हजार ६०० रुपये असा दर मिळत आहे.

गेल्या आवठवड्याभरापासून खरीपातील अंतिम पिक असलेल्या तूरीची आवक सुरु झाली आहे. सुरवातीला हमी भाव केंद्र सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे ६ हजारापर्यंतच होते. पण सध्या तूरीनेही ६ हजार ५०० चा टप्पा ओलांडलेला आहे.

शेती मालाला योग्य दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक अशी भूमिका संपूर्ण हंगामात घेतली होती. त्यामुळे या तीन्हीही पिकांचे उत्पादन घटले असले तरी वाढीव दरामुळे शेतकर्‍यांना मोठा आधार मिळालेला आहे.

हे देखील वाचा