झेंडूसह अन्य फुलांवर चालते ‘या’ संपूर्ण गावाचे अर्थकारण

Marigold-zendu-shirsoli-story

झेंडूची शेती

शेत शिवार । जळगाव : केवळ फुलांवर संपूर्ण गावाचे अर्थकारण चालते, असे म्हटल्यास कुणीच विश्वास ठेवणार नाही. मात्र उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या शिरसोली या गावाच्या अर्थकारणाचे हे समीकरण गेल्या ४० वर्षांपासून चालत आले आहे. जळगाव शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिररोली या गावाची लोकसंख्या सुमारे १५ हजार आहे. हे गाव फुलशेतीसाठी प्रसिध्द आहे. दसरा, दिवाळीला येथील फुलांना परराज्यात मागणी असते. तर काही फुलांची निर्यात देखील होते. गावातील तीनशेहून अधिक शेतकरी बारमाही विविध फुलांची शेती करतात.

शिररोली येथून जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला फुलांचा पुरवठा केला जातो. तर सीमेवर असलेल्या गुजरात व मध्यप्रदेशातही येथील फुलं जातात. गावात कोरडवाहू शेती अधिक आहे. फुलांसह पानमळे, कापूस, भाजीपाला शिवारात दिसतो. सुमारे २५० हेक्टरवर फुले, त्यात सर्वाधिक २०० ते २२५ एकरांत झेंडू, शेवंती ४० ते ४५ एकरांत, तर गुलाबही साधारण तेवढ्याच क्षेत्रात आहे. गावात फुलशेतीची सुरवातच झेंडूपासून झाली. त्याची बारमाही लागवड असते. ज्यांच्याकडे दोन एकर शेती आहे तो शेतकरी किमान १० ते १५ गुंठे क्षेत्र झेंडूसाठी राखीव ठेवतो. काही शेतकरी दोन ते तीन वेळाही झेंडूची लागवड करतात.

महिन्याला लाखोंची उलाढाल

फुलांना गणपती उत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी व लग्नसराईत मागणी अधिक असते. सर्वाधिक दरही याच काळात मिळतात. दसरा, दिवाळीला फुले हाती येण्यासाठी जुलैपासून झेंडू लागवडीचे नियोजन सुरू असते. त्याच पद्धतीने डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीत फुले हाती यावीत यासाठीही लागवड हंगाम निश्चित केले जातात. प्रति दिन ५० क्विंटल आवक गणपती, दसरा, दिवाळीच्या काळात असते. डिसेंबर ते मार्च या दरम्यान गावशिवारातून प्रति दिन २० ते २५ क्विंटल झेंडूची आवक होते.

यासह गुलाब, शेवंतीसह जरबेरा फुलांचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात केले जाते. आता या भागात काही रोपवाटिका देखील सुरु झाल्या आहेत. तेथे शेडनेटसह अन्य तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केला जात आहे. फुलशेतीच्या बळावर शिरसोली गावाचे अर्थकारणही मजबूत झाले आहे. महिन्याला काही लाख रुपयांची उलाढाल होते. तर ८०० पर्यंत मजुरांना त्यातून रोजगार मिळतो.

Exit mobile version