नवी दिल्ली – केंद्र सरकारने वादग्रस्त ३ कृषी कायदे रद्द केल्यानंतरही शेतकर्यांकडून आंदोलन सुरुच आहे. शेतकरी घरी जायला तयार नाहीत. आता शेतकर्यांनी अन्य मागण्या केंद्र सरकारसमोर ठेवल्या आहेत. दिल्लीच्या सीमेवर गत वर्षभरापासून सुरु असलेले आंदोलन केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चर्चेत राहिले आहे. आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना, अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केल्यानंतर आंतरराष्ट्रीयस्तरावर शेतकर्यांच्या आंदोलनाची चर्चा झाली. आंदोलनकर्त्यांना मिळणार्या पंचतारांकित सुविधा व त्यासाठी परदेशातून मिळणार्या फंडींगवरुन देखील खूप चर्चा झाली. आता या आंदोलनात वर्षभरात किती खर्च झाला? याची आकडेवारी समोर आली आहे.
संयुक्त किसान मोर्चाने देशात दिल्लीच्या सीमेवर मागील १ वर्षापासून सुरु असणार्या शेतकरी आंदोलनाच्या खर्चाबाबत खुलासा केला आहे. शेतकरी आंदोलनासाठी किसान मोर्चाला आलेल्या देणग्यांची माहिती यात दिली. २६ नोव्हेंबर २०२० ते २९ नोव्हेंबर २०२१ या काळात शेतकरी संघटनांना तब्बल ६ कोटी ३५ लाख ८३ हजार ९४० रुपये देणगी मिळाली आहे. त्याचसोबत एकूण ६ कोटी ३५ लाख रुपयांपैकी शेतकरी संघटनांनी आंदोलनासाठी ५ कोटी ३९ लाख ८३ हजार रुपये खर्च केले आहेत. सध्या शेतकरी संघटनांकडे ९६ लाख शिल्लक आहेत.
आंदोलन करणार्या शेतकरी संघटनांच्या मते, सर्वात जास्त खर्च व्यासपीठ, स्पीकर आणि लाईट व्यवस्थेसाठी झाला आहे. जवळपास ८१ लाख ४७ हजारपेक्षा जास्त रक्कम या तीन गोष्टीसाठी गेल्या वर्षभरात खर्च झाली. तर आंदोलनकर्ते शेतकरी यांच्या आंघोळीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी १७ लाख ९५ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली आहे. आंदोलक शेतकर्यांच्या औषध-उपचारासाठी ६८ लाख ५७ हजारांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. ताडपत्री, कॅमेरा, वॉकीटॉकीसाठी ३८ लाख रुपये, आंदोलनस्थळाच्या स्वच्छतेसाठी ३२ लाख रुपये तर लंगर मंडपासाठी ५१ लाख रुपये, पावसापासून संरक्षणासाठी वॉटर प्रुफ टेंटवर १९ लाख रुपयांहून अधिक, टीन शेडसाठी ४५ लाख तर आंदोलनाच्या प्रचार प्रसारासाठी आयटी सेलवर ३६ लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.