औरंगाबाद : खरिप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पीकाला बसला. आता शेतकर्यांनी उन्हाळी हंगामाची तयारी सुरु केली आहे. खरिपात सोयाबीनचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकर्यांनी याच पिकाच्या पेरणीवर अधिकचा भर दिला आहे. उन्हाळी सोयाबीन हा नवा प्रयोग असल्याने याचे नियोजन देखील अत्यंत महत्वाचे आहे.
गत हंगामात सोयाबीनचे दर ६ हजार २००च्या वर पोहचले. खरीप हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनचे दर कमी असले तरी मध्यावर दरात वाढ झाली होती. यामुळे येणार्या काळातही सोयाबीनला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे. कदाचित यामुळेच अनेकांनी उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग केलेला दिसतो.
मुळात उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग कधी केला जात नाही. यंदा मराठवाड्यात अनेक शेतकर्यांनी हा धाडसी प्रयोग करण्याचे ठरविले आहे. मात्र हे बेमोसमी असल्यामुळे खरिपाप्रमाणे या सोयाबीनला उतार मिळेल का नाही याबाबत साशंका आहे. यामुळे आता पेरणीपासून प्रत्येक टप्प्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादनामध्ये एकात्मिक कीटक व्यवस्थापन केल्यास अधिकचा फायदा होणार आहे. त्यामुळे निंबोळी अर्क, बिव्हेरिया बॅसियानासारख्या जैविक तसेच इमामेक्टिन बेन्झाएट, क्लोरअॅट्रनिलीप्रोल अशा रासायनिक कीटकनाशकाचा एकात्मिक वापर केल्यास नक्कीच फायदा होणार आहे.
सध्या असलेले पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. काही भागात सोयाबीनला फलधारणा झालेली आहे. तर दुसरीकडे दरही टिकून आहेत त्यामुळे अजूनही १५ दिवस सोयाबीनचा पेरा सुरुच राहील, असा तज्ञांचा होरा आहे.
हे देखील वाचा :