बीड : दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणार्या बीड जिल्ह्यातील धूनकवडगाव या लहानशा गावातील कल्याण कुलकर्णी या प्रगतिशील शेतकर्याने खळकाळ जमिनीवर आधुनिक फळबागेची लागवड करत लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. कुलकर्णी यांच्या फळबागेत ड्रॅगन फ्रूट, मोसंबी, जांभूळ, सीताफळ, केशर आंबा नारळ अशा अनेक फळांची लागवड करण्यात आली आहे. आता तर त्यांनी डोंगर माथ्यावर एक कोटी लीटर पाणी साठवण क्षमतेचे शेततळे देखील उभारले आहे.
पेशाने नोकरदार असलेले कल्याण कुलकर्णी हे प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. २०१२ साली त्यांनी त्यांच्या खडकाळ जमीनीवर फळबाग घेण्याचे निश्चित केले. त्यांचा हा निर्णय ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले तर काहींना ते अशक्यप्राय देखील वाटले. मात्र योग्य नियोजन केले तर खडकाळ जमिनीवर देखील अधिक उत्पन्न काढता येऊ शकते, अशा निश्चय कुलकर्णी यांनी केला.
हंगामानुसार ते फळबागांची लागवड करतात. ४ एकर जमिनीवर मोसंबीचे ७०० झाडे लावण्यात आली आहे. तर ७ एकरावर डाळिंबाची लागवड करण्यात आलेली आहे. यासह केशर आंब्याचे १२०० झाडे असून १ एकर क्षेत्रावर २००० ड्रॅगन फ्रूट झाडांची लागवड करण्यात आली आहे. तर सीताफळाचे १६०० आणि २५० झाडे नारळाची लावण्यात आली आहेत. रासायनिक खताबरोबरच पिके आणि फळबागांना शेणखत कोंबडी खत आणि सेंद्रिय खताची मात्रा अधिक देण्यात येते.
कुलकर्णी यांच्याकडे दोन गावरान बैलांसह चार गावरान गाई आहेत. जनावरांचे मलमूत्र बाजूच्या हौदात साठवून त्यात गूळ व बेसन पीठ टाकून ठिबकच्या माध्यमातून झाडांपर्यंत सोडले जाते. वर्षाला १०० ट्रॉली शेणखत शेतात टाकला जातो. डोंगर माथ्यावर एक कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता असणारे शेततळे उभारण्यात आले आहे. यामुळे फळबागांना चार महिने पाणीपुरवठा करणे शक्य होते. उंचीवर शेततळे असल्यामुळे कुठल्याही विद्युत उपकरणाशिवाय शेताला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो.