ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील हजारो शेतकरी पंतप्रधान किसान शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राहिले आहेत. या योजनेसाठी असणाऱ्या एनआयसी कंपनीच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जानेवारीमध्ये योजनेतील रक्कम ही बँक खात्यात जमा झाली नाही. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर व मुरबाड तालुक्यातील दोन लाखांहून अधिक शेतकरी पंतप्रधान किसान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत.
त्यांनाही तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे. अनेक शेतकरी या योजनेचा लाभ मिळावा यासाठी वर्षभर तहसील कार्यालयात चकरा मारत असून त्यांनाही संबंधित वेबसाइटचा पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण सांगून वारंवार परत पाठविले जात आहे. ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयात एनआयसी कंपनीने स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यांना कल्याण तालुक्यातील नायब तहसीलदार यांनी वारंवार संपर्क करूनही कार्यालयाच्या वापरासाठी असणारा ओटीपी देण्यात आलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे खाते सुरू झाले नाही.
हीच स्थिती भिवंडी व शहापूर, अंबरनाथ तालुक्यातील आहे. शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये देण्यासाठीच्या या योजनेचा नियमितपणे लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीची सूर आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा यासाठी वर्षभर शेतकरी तहसीलदार कार्यालयात चकरा मारत आहे. मात्र येथील अधिकारी फक्त पोर्टल बंद आहे, हेच उत्तर देतात.
हे देखील वाचा :