जळगाव : ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये होवू लागला आहे. महाराष्ट्राबाहेर काही राज्यांमध्ये ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी शेतकर्यांना लाखों रुपयांचे अनुदान दिले जाते. सामान्यतः ड्रॅगन फ्रुट थायलंड, व्हिएतनाम, इस्त्रायल आणि श्रीलंकेमध्ये लोकप्रिय आहे. मात्र आता भारतातही यशस्वीरित्या ड्रॅगनची शेती केली जाते. ड्रॅगन फ्रुट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे.
ड्रॅगन फ्रुटची शेती करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. एका एकराच्या शेतात वार्षिक ८ ते १० लाख रूपयांची कमाई केली जाऊ शकते. परंतु सुरूवातीच्या कालावधीत यासाठी तुम्हाला ४ ते ५ लाख रूपयांपर्यंत खर्चही करावे लागू शकतात. भारतात पहावी तशी ड्रॅगन फ्रुटची शेती होत नसली तरी अलीकडच्या काही वर्षांमध्ये ड्रॅगन फ्रुट शेतीकडे अनेक शेतकरी वळत आहे.
हरयाणा सरकारतर्फे १२ लाखांचे अनुदान
हरयाणा सरकारनं शेतकर्यांना प्रति एकर १ लाख २० हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये शेतीसाठी शेतकरी किमान १० एकर शेतीसाठी अनुदान घेऊ शकतात. ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी अशाप्रकारची योजना आणणारं हरयाणा हे पहिलं राज्य ठरलं आहे. यात प्रति एकर ७० हजार रूपये ट्रेलिसिंग सिस्टम आणि ५० हजार रूपये ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी दिले जात आहेत. हरयाणा सरकारच्या वेबसाईटवर यासंदर्भात अधिक माहिती उपलब्ध आहे. १० एकरांमध्ये ड्रॅगन फ्रुटची शेती करणार्यांना सरकार १२ लाख रूपयांची आर्थिक मदत देत आहे.
आरोग्यदायी फळ
ड्रॅगन फ्रुट हे आरोग्यदायी फळ म्हणून ओळखले जाते. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही मदत होते. ड्रॅगन फ्रुटमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असतं. जे शरीरातील हाडांच्या मजबुतीसाठी उपयोगी असतं. त्यामुळे सांधेदुखीवर ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरतं. तसेच यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होण्यासाठी मदत होते.