पुणे : निवृत्तीच्या वयात शेती करण्यास सुरुवात करणाऱ्या 70 वर्षीय हमिरसिंग परमार नावाच्या एका शेतकाऱ्याने लिंबू शेतीतून वर्षाला 5 लाखांची कमाई सुरू केली आहे. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले हमीरसिंग परमार हे पारंपरिक शेती करायचे. जगणे कठीण होते. वयाच्या 60 व्या वर्षी, जेव्हा लोक सहसा निवृत्तीची योजना आखतात, तेव्हा त्यांनी नव्याने शेती करण्यास सुरुवात केली. 10 वर्षांपूर्वी त्यांनी सुमारे 3 एकर जमिनीवर लिंबाची बाग लावली. आज ते गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये त्याची विक्री करतात. यामुळे त्यांना दरवर्षी 5 लाखांहून अधिक उत्पन्न मिळते. त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगाराशी जोडले आहे.
बिहारच्या एका शेतकऱ्याला कल्पना सुचली
70 वर्षीय हमीर सिंग सांगतात की, 12 वर्षांपूर्वी मी बिहारच्या अभिताप सिंगला भेटलो होतो. झालावाड, चुडासह अनेक भागात ते नैसर्गिक शेती करतात. त्यांना व्यावसायिक शेतीचा खूप अनुभव आहे. त्यांनी मला पारंपारिक शेती सोडून नैसर्गिक शेती करण्याचा सल्ला दिला आणि लिंबू शेतीतून चांगला नफा मिळू शकतो असे सांगितले. यानंतर हमीर सिंह यांनी 226 लिंबाची रोपे खरेदी केली. त्याला प्रति रोप 26 रुपये मोजावे लागले. उर्वरित शेत तयार करण्यासाठी लागणारा खर्च आणि खत इत्यादी एकूण 10 हजारांपेक्षा कमी खर्चात त्यांनी ते सुरू केले.
पहिल्या वर्षी 10 पट नफा
हमीर सिंग सांगतात की, वर्षभराच्या मेहनतीनंतर लिंबाची बहुतेक झाडे तयार झाली आणि त्यांना फळे येऊ लागली. त्यानंतर मी ते स्थानिक बाजारात विकायला सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस बाजारात योग्य भाव मिळाला नाही, पण नंतर चांगले पैसे मिळू लागले. मला अजूनही आठवतं, त्या हंगामात जवळपास एक लाख रुपये कमावले होते. त्यानंतर कधीच मागे वळून पाहावे लागले नाही. वर्षानुवर्षे उत्पन्न आणि रोपांची संख्या वाढत गेली. सध्या हमीर सिंग दरवर्षी 600 ते 700 टन लिंबूचे उत्पादन घेतात.
मूल्यवर्धन केले तर कमाई लाखांवर पोहोचली
हमीर सिंग सांगतात की, लिंबाचे उत्पादन चांगले व्हायचे, पण अनेक वेळा योग्य भाव मिळत नसे. यासोबतच संपूर्ण फळे विकली जात नसल्याचा प्रकार अनेकवेळा व्हायचा आणि आमच्याकडे ती ठेवण्यासाठी जागाही नसायची. अशा परिस्थितीत अनेक वेळा लिंबाची फळे खराब व्हायची. त्यामुळे नुकसानही सहन करावे लागले. मग त्यातून लोणचं तयार करायचा विचार मनात आला.
ते सांगतात की आपण लहानपणापासून लिंबू लोणचे वापरत आलो आहोत. हे तयार करणे देखील खूप सोपे आहे आणि त्याची किंमत देखील कमी आहे. मला वाटले की ते व्यावसायिक पातळीवर का तयार करू नये जेणेकरून त्यातून उत्पन्नही मिळेल आणि फळे साठवण्याचा त्रास टाळता येईल. त्यानंतर हमीर फॅमिली फार्मच्या बॅनरखाली लिंबाचे लोणचे तयार करून मार्केटिंग सुरू केले. ते गुजरात आणि इतर राज्यांतील त्यांच्या परिचितांना पाठवू लागले. यामुळे त्याला भरपूर कमाई होऊ लागली. सध्या ते 350 रुपये किलोने लोणचे विकतात. यासोबतच हमीर सिंग इतर शेतकऱ्यांना लिंबू बागायतीचे प्रशिक्षणही देतात. देशाच्या विविध भागातून लोक येथे प्रशिक्षणासाठी येतात. हमीर यांच्या गावातच त्यांच्या देखरेखीखाली 10 शेतकरी लिंबाची लागवड करून चांगला नफा कमावत आहेत.