उस्मानाबाद : सन २०२० साली झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या भागातील पिकांची पाहणी केली केल्यानंतर पीक विम्यारी रक्कम शेतकर्यांना तातडीने देण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाने देखील शेतकर्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांना अद्यापही नुकसान भरपाईचे पैसे मिळालेले नाही. याविरोधात शेतकर्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे.
खरीप २०२० च्या पीक विम्याचे रक्कम विमा कंपन्यांकडून शेतकर्यांना अदा केली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. अखेर २ वर्षानंतर याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले असून निकाल दिल्यानंतर ६ आठवड्यात ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. असे असताना ३ आठवडे उलटले तरी कोणतीच प्रक्रिया यासंदर्भात पूर्ण झालेली नाही. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार २८७ शेतकरी विमा रकमेच्या प्रतिक्षेत आहेत.
त्यामुळे शेतकर्यांचा लढा अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे आता उस्मानाबाद जिल्ह्यातून वेगळ्याच मोहिमेला सुरवात झाली आहे. आ. राणाजगजितसिंह यांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन बळीराजा स्वाक्षरी ही मोहिम सुरु केली आहे.
जिल्हाभरातील शेतकर्यांच्या स्वाक्षर्या घेऊन तात्काळ विमा रक्कम ही जमा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात येणार आहे. शेतकर्यांच्या हक्काचे पैसे त्यांना देण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विमा कंपन्यांचा मनमानी कारभार पुन्हा शेतकर्यांच्या मुळावर उठत आहे. यामुळे ही स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह यांनी दिली.