गोंदिया : गोंदिया जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून उभारण्यात आलेले खरेदी केंद्र हे बंद झाले आहे. धान पिकांच्या खरेदीचा लक्षांक ठेऊनच ही खरेदी केंद्र सुरु झाली होती. पण अवघ्या १५ दिवसांमध्ये धानाची खरेदी करुन केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. दुसरीकडे आता विदर्भात पाऊस सक्रीय झाल्याने हे धान्य ठेवायचे कुठे असा सवाल उपस्थित झाला आहे.
विदर्भातील शेतकर्यांचे धान पिक हे मुख्य पीक असले तरी खरिपातच त्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. गतवर्षी मात्र, पोषक वातावरणामुळे शेतकर्यांनी उन्हाळी हंगामातही धान पिकाचे उत्पादन घेतले होते. शिवाय उत्पादन वाढूनही खरेदी केंद्रावर सर्व मालाची खरेदी झाली होती. त्यामुळे यंदा उन्हाळी हंगामात धान पिकाचे क्षेत्रात कमालीची वाढ आणि पोषक वातावरणामुळे उत्पादनही वाढले. असे असले तरी खरेदी केंद्रांनी आपला कोटा ठरवून घेतला व तो पूर्ण झाल्यावर सर्व खरेदी केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
गेल्या ५ दिवसांपासून विदर्भात पाऊस हा सक्रिय झाला आहे. यामुळे शेती कामे पार पाडत असताना शिल्लक धानाची सुरक्षितता महत्वाची आहे. एकीकडे पेरणीची लगबग आणि त्यात शिल्लक धानाची चिंता अशा दुहेरी संकटात गोंदियातील शेतकरी आहेत.