जळगाव : सध्या पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकर्यांना आता यंत्राद्वारे मशागत केल्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. मात्र शेती कामांसाठी शेतकर्यांना ट्रॅक्टरच मिळत नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. शिवाय जेथे ट्रॅक्टर उपलब्ध होते तेथे शेतकर्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.
इंधन दरात वाढ होत असल्याने शेती व्यवसाय करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या दर वाढीमुळे यंदा नव्याने मळणी यंत्र मालकांनी तसेच हार्वेस्टर यंत्रांच्या मालकांनी दरवाढ केली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या अडचणी वाढत आहे.
गतवर्षी एक एकर शेत जमिन नांगरणीसाठी १ हजार ५०० रुपये तर यंदा २ हजार रुपये, रोटरण्यासाठी गतवर्षी ६०० हजार तर यंदा १ हजार रुपये व शेत मोगडण्यासाठी गतवर्षी एकराला ८०० रुपये तर यंदा १ हजार रुपये शेतकर्यांना द्यावे लागत आहे. यंत्राच्या दराबरोबर मजुरांचेही दर वाढत आहे. मजुरांना गतवर्षी २०० रुपये दिवसाकाठी तर यंदा ३०० रुपये द्यावे लागत आहे.
हंगमापूर्वी नांगरणी, मोगडणी, रोटरणे आदी मशागतीची कामे केली जातात. या कामांसाठी सर्रास यंत्राचाच वापर केला जात आहे. मात्र याचा खर्च वाढल्याने शेतकर्यांना त्याची झळ सोसावी लागत आहे. डिझेलदर वाढ जर थांबली नाही तर येणार्या काळातही शेतकर्यांना आर्थिक फटका बसू शकतो.