शेतकरी चक्क शासकीय कार्यालयांमध्ये सोडतायेत साप; वाचा काय आहे प्रकरण

snak

सांगली : शेतातील साप आणि अन्य वन्य प्राणी पकडून ते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सोडले जात असल्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यात जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण, तहसील कार्यालयांचा समावेश आहे. शेतकर्‍यांच्या या अनोख्या प्रकाराची राज्यभर चर्चा रंगली आहे. याच मुख्य कारण म्हणजे, शेतकर्‍यांना रात्रीच्या ऐवजी दिवसा वीजपुरवठा हवा आहे.

सध्या रब्बी हंगामातील भरण्याचे म्हणजेच पिकांना पाणी देण्याचे दिवस आहेत. सध्या महावितरणकडून नेमके रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी विंचू, साप यांचा वावर असल्याने शेतकर्‍यांच्या जिवितास धोका आहे. त्यामुळे दिवसा विद्युत पुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे.

या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात आंदोलनही सुरु केले होते असे असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याने पाणी देताना आढळलेले जंगली प्राणी थेट शासकीय कार्यालयात सोडण्याचे आदेश त्यांनी शेतकरी आणि पदाधिकार्‍यांना दिले होते. शेतात काम करीत असताना असे साप आढळून आले की थेट शासकीय कार्यलयांमध्ये सोडले जात आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर असताना आम्ही शेतीकामे करायची कशी हे यामधून दाखवून द्यायचे आहे.

या आहेत शेतकर्‍यांच्या मागण्या

ऐन रब्बी हंगाम जोमात असताना केलेली सक्तीची वीजबिल वसूली तात्काळ थांबवून शेतकर्‍यांना मुदत देण्यात यावी, सध्या केवळ सात तासच विद्युत पुरवठा होत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य नाही त्यामुळे नुकसान होत असून किमान १० तास विद्युत पुरवठा करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच रात्रीच्या ऐवजी दिवसा विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version