पुणे : शेतात मजूर मिळत नाही, ही ओरड सर्वच शेतकर्यांची असते. उत्पादनापेक्षा मजूरी जास्त मोजावी लागत असल्याचा अनुभव अनेकवेळा शेतकर्यांनी घेतला आहे. मजूर टंचाईची समस्या केवळ भारतातच नव्हे तर परदेशांमधील शेतकर्यांना भेडसावत आहे. शेतमजूर टंचाईला कंटाळून ऑस्ट्रेलियामधील शेतकर्यांनी रोबोट्स व स्वयंचलित यंत्रांमध्ये गुंतवणूक वाढवण्यास सुरुवात केली आहे.
ऑस्ट्रेलियन शेतजमिनीमध्ये व्यावसायिक शेती करण्यासाठी रोबोट्सचा वापर केला जात आहे. रोबोट रासायनिक हाताळणी, फवारणी आणि गवताची साधी कामे करू शकतात. तणनाशके अधिक कार्यक्षमतेने स्लॅश करण्यासाठी आणि फवारण्यासाठी रोबोट्स प्रोग्राम होत आहेत. यामुळे या विषयाशी निगडीत क्षेत्रात नवे उद्योग निर्माण होवू लागले आहेत.
अलिकडच्या काही महिन्यांत कामगारांची टंचाई आणि तीव्र हवामानामुळे यांत्रिकीकरणामधील गुंतवणूकीला वेग आला आहे. नवीन संधी या दृष्टीने कृषी क्षेत्रात खरोखरच मोठे उज्ज्वल भविष्य आहे. तंत्रज्ञान अधिक तरुणांना कृषी उद्योगाकडे आकर्षित करेल, असे तेथील तज्ञांचे म्हणणे आहे.