शेत शिवार । नाशिक : अलीकडच्या काही वर्षात शेतकरी पारंपारिक पीकांकडून अन्य पीकांकडे वळला आहे. कमी कालावधीत भरघोस उत्पन्नाची हमी असल्याने अनेक शेतकरी फुलशेतीला प्राधान्य देवू लागले आहेत. सध्या फुलांच्या बाजारात गुलाब, जरबेरा, शेवंती कार्नेशन, अँथुरियम आणि ऑर्किडस इत्यादीची फुले चांगली किंमत मिळवून देत असल्यानेे या फुलांची मोठ्याप्रमाणात लागवड केली जाते. तर दसरा, दिवाळीच्या सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलांना मागणी असते. मात्र कधी अतिवृष्टी तर कधी वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान देखील होते. काही ठिकाणी तंत्रशुध्द पध्दतीने लागवड न केल्यामुळे देखील शेतकर्यांना नुकसान सोसावे लागते. यासाठी या सदरात फुलशेतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व तंत्रशुध्द माहिती देण्यात आली आहे.
शेडनेट व हरितगृहामध्ये फुलशेती
शेडनेट व हरितगृहामध्ये फुलशेती लागवडीसाठी लाल रंगाची (लॅटेराईट प्रकारची) माती वापरणे आवश्यक असते. मातीचा सामु (कझ)६.५ ते ७ दरम्यान असावा. क्षारता १ मिली लिटर होस प्रति सें.मी. पेक्षा कमी असावी. लागवडीसाठीसाठी ६०% माती, २०% भाताचे तुस/वाळु, २०% शेणखत याचा माध्यमात वापर करावा. माध्यमाचे निर्जंतुकीकरणासाठी फॉरमॅलिन ०.२% किंवा बासमिड ४० ग्रॅम प्रती चौ.मी. क्षेत्रास वापरावे. हरितगृहामध्ये फुलपिकांची लागवड गादी-वाफ्यावर केली जाते. त्यासाठी योग्य लांबी (हरितगृहाच्या लांबीप्रमाणे) १ ते १.६ मी. रुंदी व ३० सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावे दोन वाफ्यात ५० ते ६० सें.मी. अंतर असावे.
अंशत: नियंत्रीत वातावरणात फुलांचा रंग पाकळ्यांची संख्या फुलदांड्याची लांबी या बाबी तापमानावर अवलंबुन असतात. योग्य वाढीसाठी कमाल तापमान (दिवसा) २० ते २५ अंश सें.ग्रे. तर किमान तापमान १८ ते २० अंश सें.ग्रे. असावे सापेक्ष आर्द्रता ६० ते ७०% असावी. कर्ब वायुची योग्य पातळी १००० ते ३००० पीपीएम असावी. अशंत: नियंत्रित हरितगृहामध्ये फॉगिंग/मिस्टींग चा वापर करुन सापेक्षा आर्द्रता वाढविली जाते व तापमान त्यायोगे कमी केले जाते. उन्हाळ्यात ५०% शेडनेट वापरुन सुर्यप्रकाशाची तीव्रता कमी करावी. तसेच हरितगृहाच्या झडपा दिवसा उघडुन संध्याकाळी बंद कराव्यात.
गुलाब, जरबेरा, कार्नेशनची लागवड करतांना अशी घ्या काळजी
गुलाब : बाजारपेठेत गुलाब हे सर्वात म्हत्वाचे व्यापारी फुल म्हणून मानले जाते. युरोपात गुलाब या पिकास प्रचंड मागणी असून फुलांच्या मागणीत प्रथम क्रमांक लागतो. तसेच भारतात बंगळुरू, पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी, कोलकाता, दिल्ली, चंदीगड व लखनौ या शहरांभोवती गुलाबाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. हायब्रीड टी (लांब दांडा व मोठी फुले) तसेच फ्लोरीबंडा (आखूड दांडा व लहान फुले) प्रकारच्या फुलांना मोठी मागणी आहे. लांब दांड्याच्या (४० ते १२० सें.मी.) मोठ्या फुलांचे १३० ते १५० फुले चौ.मी. एवढे उत्पन्न मिळते तसेच आखूड दांड्याच्या (३० ते ७०) से.मी. छोट्या फुलांचे २०० ते ३५० फुले/चौ.मी. एवढे उत्पन्न मिळतेया पिकाची लागवड मे-जुन महिन्यामध्ये जमिनीमध्ये साधारणत: ४५ बाय २० सें.मी. अंतरावर लागवड करावी. दोन ओळीत ३० ते ४५ सें.मी. व दोन रोपात १५ ते २० सें.मी. अंतर असावे. ६ ते ९ रोपे प्रती चौ.मी. क्षेत्रावर लावावीत. या पिकात पाण्यातील अन्नद्रव्ये जोमाने वाढणार्या फांद्याकडे पाठविण्यासाठी फांद्या जमिनीलगत ४५ अंश कोनात वाकविणे, (बेंडिग) पानाच्या बेचक्यातुन वाढणार्या कळ्या खुडणे (डिसबडिंग) फांदीवरील मुख्य कळी शेंड्यासह काढणे (टॉपिंग) इ. आंतरमशागतीचे कामे करावी लागतात. गुलाबाला १० किलो शेणखत + ३०:३०:२० ग्रॅम नत्रःस्फुरद:पालाश प्रति चौ.मी. क्षेत्रास द्रवरूपात लागवडीनंतर ३ आठवड्यांनी द्यावे, नंतर एक महिन्याच्या अंतराने सुरुवातीला ४ महिने विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे द्यावीत.
जरबेरा : गादी वाफ्यावर दोन ओळीत ३० बाय ३० सें.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी. रोपांची संख्या ७ ते ९ प्रती चौ.मी. जरबेरासाठी गादी वाफे खुरपणी करुन जमीन भुसभुशीत ठेवावी. तसेच वाळलेली रोगट पाने, खराब कळ्यांची व फुलांची काढणी करावी. जरबेराला चांगले कुजलेले शेणखत १० किलो प्रती चौ.मी. या प्रमाणात मिसळुन द्यावे. सुरुवातीचे तीन महिने १०:१५:२० ग्रॅम/चौ.मी./महिना व चौथ्या महिन्यापासुन १५:१०:३० ग्रॅम/चौ.मी./महिना, चार आठवड्यात विभागुन द्यावे. याशिवाय सुक्ष्म अन्नद्रव्ये बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस इ. प्रत्येकी ०.१५% (१.५ मि.ली./लि.) महिन्यातुन एकदा द्यावे. खते ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास झाडांची वाढ जोमदार होऊन भरघोस व दर्जेदार फुलांचे उत्पादन मिळते.
कार्नेशन : गादी वाफ्यावर जोड ओळीत लागवड करावी. लागवडीचे अंतर १५द१५ सें.मी., २०द२० सें.मी. ठेवावे दोन जोड ओळीत ३० सें.मी. अंतर सोडावे रोपे जास्त खोल लावु नयेत. रोपांचा बुंधा जमीनीपासुन किंचीत वर ठेवल्यास मर रोग होत नाही. कर्नेशन रोपांच्या लागवडीनंतर २५-३० दिवसांनी रोपांचा शेंडा खुडणे (पिंचींग) आणि फुलदांड्यावरील अनावश्यक कळ्या खुडणे (डिसबडिंग) इ. कामे करावी लागतात. तसेच कर्नेशनची फुले नाजुक व उंच वाटत असल्यामुळे जाळ्यात वापरुन आधार देणे आवश्यक असते.