औरंगाबाद : जागेअभावी गच्चीवर, खिडक्यांमध्ये किंवा बाल्कनीमध्ये विविध आकारांच्या कुंड्या ठेवून शोभिवंत फुलझाडं, फळझाडं आणि भाजीपाला लावण्याचा छंद अनेकजण जोपासताना दिसतात. फावल्या वेळात हौसेने करता येण्याजोगा हा घरगुती छंद आहे. त्यात थोडे कष्ट असले, तरी ते आनंददायक असतात कारण त्यातून सृजनाचा, सौंदर्यनिर्मितीचा आनंद मिळतो. बाल्कनीमधल्या बागेची जोपासना करण्यासाठी फुलझाडांची, फळझाडांची माहिती असणं आवश्यक आहे. तसंच त्यासाठी लागणारी हत्यारं, बी-बियाणं, खतं, कलमं, रोपं इत्यादींचीही माहिती असावी लागते.
फुलांच्या बाल्कनीची मशागत करताना दोन हेतू साध्य होतात. एक म्हणजे सौंदर्यात्मक दृष्टिकोनातून घरातच शोभादायक फुलबाग निर्माण होते आणि दुसरं म्हणजे व्यक्तिगत उपभोगासाठी फुलं, फळं, भाजीपालाही सहजपणे मिळतो.
बोर्डा येथे तीन तरुणांनी एकत्र येत तब्बल ३० गुंठे क्षेत्रात २२ हजार मातीच्या कुंड्यांचा वापर करत मृदेच्या बेडचा वापर न करता फूलशेत केली आहे. शीतल आणि दिनेश या चव्हाण बंधूंनी आपले शेजारी मित्र शांतीलिंग करंडे यांच्यासमवेत यंदा पुन्हा एका नव्या प्रयोगाला आकार दिला आहे. यासाठी आपल्या पॉलिहाऊसमध्ये जरबेरा फुलवायचा; पण प्रचलित पद्धतीने नव्हे तर नव्या ‘टेक्निक’ चा वापर करत असा त्यांनी निश्चय केला होता.
त्यानुसार मातीच्या बेडऐवजी फुलदाणी म्हणून वापरण्यात येणाऱ्या कुंडीचा वापर करत त्यांनी सुनियोजित पद्धतीने ३० गुंठ्यात एक महिन्यापूर्वी जरबेरा फुलाची लागवड केली आहे. त्यांनी आजवर मातीच्या बेडवर जरबेरा फूलशेती केली होती. यात जोखीम वाढली, खर्च वाढला. परत यासाठी लागणारे शेणखत व गेरू माती मिळणे कठीण झाले. यामुळे या मातीच्या बेडला फाटा देत चव्हाण व करंडे यांनी आपल्या ३० गुंठे क्षेत्रासाठी बेळगाव येथून मातीच्या ‘लाईट वेट’ २२ हजार ५०० कुंड्या आणत त्या लोखंडी स्टॅण्डवर बसवल्या. यावर पुढे शेती फुलवली आहे.
या कुंड्यात पुणे येथून प्रत्येकी ४० रुपयाला एक याप्रमाणे साडेबावीस हजार रोपे आणली. ती कोकोपीटच्या सहाय्याने लावली. यास ड्रिपने दिवसांतून तीनदा, प्रत्येकी २४० मिली पाणी तसेच खत, औषधी दिली जात आहेत. यामुळे तर खर्च वाचलाच, शिवाय प्लॉटची लाईफ वाढेल, असे शीतल चव्हाण व दिनेश चव्हाण यांनी सांगितले.
वेगवेगळ्या रंगांची फुलं एकत्र लावली असल्यास एकाच कुंडीत सुंदर रंगांची उधळण बघायला मिळते. झाडं लावताना कुंडीचा वरचा मातीचा पृष्ठभाग, सुकलेली फुलं, पानं, भाजांची देठं, सालं यांचा थर घालून पूर्णपणे झाकून टाकावा म्हणजे तण उगवायला अटकाव होतो. कारण तण हीसुद्धा एक प्रकारची वनस्पती असून त्याच्या वाढीला सूर्यप्रकाश लागतो. मातीचा पृष्ठभाग वर उल्लेख केल्याप्रमाणे आच्छादला की तण उगवायला प्रतिबंध होतो. एखादं रोप रोगग्रस्त झालं, खुंटलं, पिवळं पडायला लागलं किंवा पानं मुरडलेली आढळल्यास ती उपटून टाकावीत. अन्यथा इतर रोपांवर रोगाचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने काळजी घेत असल्याचे चव्हाण यांनी सांगीतले.
हे देखील वाचा :