पुणे: यंदाही पावसाने आपला लहरीपणा कायम ठेवला असल्याने याचा सर्वाधिक परिणाम खरीप हंगामातील पेरण्यावर झाला आहे. जुलै महिना उजाडला तरी महाराष्ट्रात सरासरीच्या केवळ ३५ टक्के खरिपातील पेरण्या झाल्या आहेत. अनेक भागात अजून पेरणीयोग्यही पाऊस झालेला नाही. शिवाय खरिपाचा पेरा हा १५ जुलैपर्यंत केला जातो. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये आता जुलैमध्ये काय होणार? असा प्रश्न अनेक शेतकर्यांना पडला आहे. आधीच गेल्या दोन-तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदाही तशीच काहीशी सुरुवात झाल्याने राज्यातील शेतकरी धास्तावले आहेत.
खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, धान, कडधान्य ही मुख्य पीके आहेत. खरीप हंगाम हा पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याने पावसाने गत काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावल्याने आता कुठे शेतकर्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात देखील पावसाने हजेरी लावल्याने रखडलेल्या खरीप पेरण्यांना आता वेग आला आहे. मात्र ही परिस्थिती सर्वदूर सारखी नाही, अजूनही अनेक भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस झालेला नाही.
जुलैमध्ये देखील पाऊस हा सामान्यच राहणार असल्याचे संकेत आहे. काही भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाज आहे पण याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जून तर असातसाच गेला असून जुलैमध्ये काय होणार याची धास्ती कायम आहे. जून महिन्यात पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी राहिले शिवाय तापमानही कायम राहिले. तीच अवस्था जुलैमध्ये देखील राहणार आहे.
जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात झालेल्या पावसाच्या जोरावर पेरणीचा टक्का वाढला आहे. आता कडधान्य नाहीतर सोयाबीन आणि कापसावरच शेतकर्यांचा भर राहणार आहे. जुलै महिन्यात सरासरी एवढा पाऊस राहणार असला तरी त्याचा फायदा पिकांना होणार आहे. शिवाय खरिपाचा पेरा हा १५ जुलैपर्यंत केला जातो. त्यामुळे जून महिन्यात झालेला पेरा आणि जुलैमध्ये काय चित्र राहणार यावरच खरिपाचे भवितव्य अवलंबून आहे.
राज्यात पेरण्यांचा टक्का घसरला असला तरी पावसाचा अंदाज घेऊनच शेतकरी पेरणीचा निर्णय घेत असल्याने दुबारचे संकट नसल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. शिवाय पेरण्या उशीराने झाल्याने उत्पादनावर परिणाम होणार नाही. त्यामुळे शेतकर्यांनी १५ जुलैपर्यंत खरिपाचा पेरा केला तरी उत्पादन घटणार नाही. आगामी १५ दिवसांमध्ये पेरणी क्षेत्रात वाढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी १५ दिवसांमध्ये सरासरी एवढा पेरा होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.